लासलगावः केंद्राच्या परवानगीनुसार व्यापारी आणि आडत्यांनी परदेशातून कांदा आयात केला, तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असताना केंद्र सरकार कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच इराणसह परदेशातून कांदा आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली. याचा कांद्याच्या बाजार भावावर थेट परिणाम होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, असे म्हणत कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने बोगस बियाणे, प्रतिकूल हवामान, अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस अशा कारणांनी खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा. त्याची निम्म्यापेक्षाही अधिक प्रमाणात साठवणूक असल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. अशात नवीन लाल कांदा बाजारात येण्यासाठी थोडा उशीर असताना कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इराण, तुर्की, अफगाणिस्तानसह इतर विदेशी देशातून कांदा आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परदेशी कांदा आयात करू नये. जे व्यापारी, आडते परदेशी कांदा आयात करतील त्यांना भविष्यात कांदा देऊ नये, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे.
आंदोलन पेटणार
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. सप्टेंबर महिन्यात दोन-दोनदा अतिवृष्टी झाली. ढगफुटीसारख्या पावसाने गोदावरीला चार पूर आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यापायी मंजूर झालेले अनुदान अजूनही अनेकांना मिळाले नाही. या संकटातून सावरत नाही तोच केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. येत्या काळात यावरून आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली आहे. याचा कांद्याच्या बाजार भावावर थेट परिणाम होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि आडत्यांनी परदेशातून कांदा आयात केला, तर त्यांच्या तोंडाला काळे फासू.
– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना (Maharashtra State Onion Growers’ Association opposes onion imports from abroad)
इतर बातम्याः
हवामानाचे विचित्र चित्र; राज्यात कुठे थंडी अन् कुठे होणार पाऊस, निफाड ठंडा ठंडा Cool Cool
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021