मुंबई : यंदा विधानसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी अशा सामन्याऐवजी, युतीत शिवसेना आणि भाजप यांच्यात तीव्र स्पर्धा होण्याची चिन्ह जास्त आहेत. मुख्यमंत्रीपदाचे लक्ष्य गाठण्याकरिता शिवसेनेने भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षविस्तार आणि पक्षबांधणी हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकांना आता अवघे तीन महिने शिल्लक राहिलेत आणि मुख्यमंत्रीपदावरून युतीत स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपच्या मजबूत पक्षसंघटनेपुढे टिकाव लागण्यासाठी शिवसेनेनेही पक्षसंघटन विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतलाय.
शिवसेनेने राज्यात एक एक लाख शाखाप्रमुख नोंदणीचे उद्दिष्ट ठेवलंय. महिला संघटक आणि उपशाखाप्रमुख अशी सव्वा चार लाख पदाधिकाऱ्यांची ‘भगवी फौज’ तयार करण्याची रणनीती आखण्यात आलीय. पक्षात 14 ते 27 जुलै असा ‘भगवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार असून गावागावात सदस्य नोंदणी अभियान हाती घेतलं जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी माझा ‘महाराष्ट्र् भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना रावबली जाणार आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा बैठकांचा जणू धडाका लावलाय. शेतकरी हा प्रचाराचा केंद्रबिंदू मानत उद्धव ठाकरेंनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरेही सुरु केलेत.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर युतीत सध्या सकारात्मक वातावरण असलं तरी यंदा गाफील राहून चालणार नाही याची शिवसेना नेतृत्वाला पूर्ण कल्पना आहे. यासाठी 2014 विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे. भाजपकडून अचानक दगफटका होऊ शकेल या भीतीने शिवसेनेने 288 विधानसभा मतदारसंघाची तयारी करायचं ठरवलं आहे.
लोकसभा निवडणुकीत तळागाळात पक्षाच्या संघटन बांधणीचा भाजपला फायदा झाला होता. एक बूथ 20 यूथ, हर हर मोदी घर घर मोदी, हमारा घर भाजप का घर, संपर्क फॉर समर्थन या आणि अशा अनेक संकल्पना भाजपने राबवल्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी करून विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे आणि स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे.