Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळ दक्षिण भारताला मोठा फटका बसला. त्याचाच परिणाम सध्या मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमान 10 ते 20 अंशाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात गारठा वाढला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर या भागातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हुडहुडी भरल्याचे पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरील प्रभाव संपला आहे. त्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात 17.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 3 दिवसात मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. सध्या मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतही गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिकमध्येही थंडीचा पारा पुन्हा घसरला आहे. नाशिकमध्ये तब्बल 3 अंशांनी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिकचा पारा आणखी कमी झाला असून आज 9.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल एका आठवड्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा थंडी परतली आहे.
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने निफाडमध्ये थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ओझर HAL येथे 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 67 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेल्या थंडीपासून ऊब मिळावी, यासाठी शेकोट्याही पेटवण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळे शहरात तापमान 9.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. मात्र आता अचानक अपमान 9 अंशावर पोहोचले आहे. थंडी वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. धुळ्यात थंडी वाढल्याने पांजरा नदी किनारी फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे.
पुण्यातही थंडीचे कमबॅक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात फेंगल वादळाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर पुण्यासह राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. पुण्यात रविवारी अचानक थंडीत वाढ झाल्याने किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि.१८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होणार आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून बदलत्या वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला आणि सर्दी अशा आजारांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा फटका प्रामुख्याने लहान मुलांना बसत असल्याचे दिसत आहे. यामुळे सरकारी दवाखान्यांसह खाजगी रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मागील आठवड्यापासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने गारवा देखील वाढला आहे. याचाच परिणाम थेट जनआरोग्यावर झाला आहे.