राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णात वाढ, मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

| Updated on: Sep 12, 2024 | 10:31 AM

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णात वाढ, मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
झिका व्हायरस
Follow us on

Maharashtra Zika Virus Patient increase : पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण याची आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 128 झिका रुग्णांची नोंद झाली आहेत. यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात झिका आजाराच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सुदैवाने मुंबईत अजून एकाही रुग्णाला झिका विषाणूची लागण झालेली नाही. तर पुणे महापालिका हद्दीत 91, पुणे ग्रामीणमध्ये 9, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत 6, अहमदनगर (संगमनेर) मध्ये 11, सांगली (मिरज) मध्ये 1, कोल्हापूरमध्ये 1, सोलापूरमध्ये 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहा, असे आवाहन केले आहे.

पुण्यात झिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवतो. गर्भवती महिलांच्या गर्भावर या विषाणूचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

झिका म्हणजे काय?

झिका हा एक विषाणू असून तो डासांपासून पसरतो. 1947 मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो प्रथम आढळला होता. 2015 मध्ये अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले. हा उद्रेक मायक्रोसेफली (Microcephaly) या आजारासह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता. मायक्रोसेफली हा एक गंभीर जन्मदोष आहे; ज्यामध्ये लहान मुलाचे डोके असामान्यपणे लहान असते आणि मेंदू अविकसित असतो. त्यावरून हे सिद्ध झाले, “गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.”

झिका विषाणू पसरविणारे डास घरामध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आढळू शकतात. जरी हे डास सहसा दिवसाच्या वेळी चावत असले तरी रात्रीच्या वेळीही ते चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.