नाशिक : सण-उत्सवावर असलेले निर्बंध उठवत राज्यातील दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, (Ganesh Festival) नवरात्रोत्सव (Navratri Festival) मोठ्या जल्लोषात पार पडले. या उत्सवात कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते आणि निर्विघ्न न येता हे उत्सव देखील पार पडले. मात्र, मंडळांना महावितरण कंपनीने वीजबिल पाठवून चांगलाच झटका दिला आहे. सार्वजनिक उत्सवात मंडळांना (Ganesh Mandal) घरगुती दराने वीजबिल आकारणी करण्याऐवजी व्यावसायिक दराने वीज बिले पाठवत आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 11 रुपये 86 पैसे या दराने हजारो रुपयांची बिले पाठवण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर उत्सव साजरे होत असतांना महावितरण कंपनीने मंडळांना दिलेला हा झटका चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या सर्व काळात नाशिक महानगरपालिकेने गणेश मंडळांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क माफ केले आहेत.
दरवर्षी गणेश मंडळाकडून घरगुती दराने विज बिलाची आकारणी केली जाते, उत्सव काळात महावितरण हे विशेष जोडणी करून देत असते.
यंदाच्या वर्षी तब्बल दोन वर्षातून सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतांना व्यावसायिक दराने आलेली बिले पाहून गणेश मंडळांचा संताप झाला आहे.
घरगुती दर हा साधारणपणे 3 रुपये 27 पैसे इतका आहे, तर व्यावसायिक दर 11 रुपये 86 पैसे इतका आहे. आणि याच दराने मंडळांना बिले आली आहेत.
नाशिकमधील गणेश मंडळांना आलेली बिले पाहून नवरात्र उत्सव काळातील मंडळे देखील चक्रावून गेली आहेत, वाढीव बिले कशी येणार नाहीत याबाबत महावितरण कंपनीकडे विचारणा केली जात आहे.
महावितरण कंपनीने व्यावसायिक बिले पाठवून मंडळांचा रोष ओढून घेतला असून बिले कमी करून देण्याबाबत मागणी केली जात आहे.