घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महायुतीच्या गोटातून मोठी बातमी येणार, वरिष्ठ सूत्रांची tv9 ला माहिती

| Updated on: Sep 25, 2024 | 6:37 PM

महायुतीच्या जागावाटपाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महायुतीकडून मोठी बातमी जाहीर करण्यात येणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महायुतीच्या गोटातून मोठी बातमी येणार, वरिष्ठ सूत्रांची tv9 ला माहिती
महायुती
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 60 हून अधिक जागा लढणार आहे. याबाबत वरिष्ठ सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट 60 पेक्षा जास्त जागा लढणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडे सध्या 41 जागा आहेत. आगामी निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या 3 ऑक्टोबरला महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विधान केलं आहे. आम्ही 70 ते 80 जागा लढू, असं छगन भुजबळ म्हणाले होते. तसेच अजित पवार यांच्या पक्षाकडून याआधी सुद्धा 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणार असल्याचे संकेत देण्यात आले होते.

महायुतीची काल (24 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. या बैठकीत अजित पवार गटाला 60 पेक्षा जास्त जागा देण्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बैठकीत नेमकं काय ठरलं?

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवणं हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांसाठी महत्त्वाचं आणि क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काल ही संपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच किंवा त्यांच्या पक्षाला त्या त्या मतदारसंघात संधी मिळेल, असं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याची संधी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महायुती विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्याकरता महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.