पुणे | 18 डिसेंबर 2023 : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अपघातांचे सत्र अद्यापही कायम आहे. कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात होऊन ८ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बरेच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
घाटरस्ता ठरतोय धोकादायक
सिंहगड घाटरस्ता हा धोकादायक ठरताना दिसत आहे. पर्यटकांना पायथ्यावरून गडापर्यंत आणि पुन्हा खाली नेण्यासाठी जीप वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र हीच वाहतूक आता जीवघेणी ठरताना दिसत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास काही पर्यटकांना घेऊन एक जीप पायथ्याच्या दिशेन निघाली. मात्र सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ ही जीप उलटली. यावेळी जीपमध्ये
बारा ते पंधरा पर्यटक होते. जीप उलटून बरेच जण खाली कोसळले आणि जखमी झाले.
तेथून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी तातडीने वाहने थांबवने अपघातग्रसत जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.