नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हा गुन्हा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये हिरे कुटुंबातील काही व्यक्तींचा समावेश असल्याने या गुन्ह्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात आव्हान उभं केल्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यात गुन्हा कोणत्या कारणावरून दाखल झाला याबाबत दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती मध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर लागलीच रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती त्यावरून दूसरा गुन्हा दाखल झाला आहे.
एकूणच दोन्ही गुन्हे पाहता हिरे कुटूंबियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. मालेगाव शहरातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्यानंतर अद्वय हिरे यांची राजकीय ताकद वाढली होती.
त्यातच भाजपला जय महाराष्ट्र करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अद्वय हिरे यांना उपनेते पदही देण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे यांच्या विरोधात आगामी काळात निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये अद्वय हिरे यांच्यासह हिरे कुटुंब आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये सटाणा येथील राजेंद्र गांगुर्डे यांनी अद्वय हिरे आणि त्यांचे निकटवर्तीय लकी खैरनार यांच्यासह 4 जणांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अद्वय हिरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश आणि मालेगाव पोलीस ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. जिल्हा बँकेने इतक्या दिवस का कारवाई केली नाही? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.