मालेगावः आपण भाडोत्री मजूर, कामगार असे शब्द ऐकले असतील. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये नोकरीवर कायम असणाऱ्या शिक्षकांनी चक्क आपल्या जागेवर भाडोत्री शिक्षकांची नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याची अब्रू पुरती वेशीवर टांगलीय. ऐन विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार उघड झाला असून, यावर सरकार आणि प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे महापालिका (Municipal Corporation) आणि जिल्हा परिषदेचा (ZP) शाळा आणि त्यांचा दर्जा यावर न बोललेलेच बरे. त्यामुळे अनेक चांगल्या काम करणाऱ्या शाळांच्या नावालाही बट्टा लागला. आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकण्याचे काम मालेगावमध्ये उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचे महापालिका उपायुक्तांनी सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय?
मालेगावमध्ये महापालिकेची उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये दोन भाडोत्री शिक्षक ज्ञानदान करत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यातील एक महिला मुख्याध्यापकांच्या वर्गावर शिकवत होती. तर दुसरा एक शिक्षक दुसऱ्या वर्गावर ज्ञानदान करत होता. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा भांडाफोड झाला. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याची पालकांना सुद्धा खबर नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात यावरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
महिन्याकाठी मिळायचे 1500
मालेगावमधील उर्दू शाळेत नोकरीवर कायम स्वरूपी काम करणाऱ्या दोन शिक्षकांनी आपल्या जागी दोन भाडोत्री शिक्षक ठेवले होते. त्यामुळे हे शिक्षक नोकरीवर नसायचे. त्यांच्या जागी हे भाडोत्री शिक्षक शिकवायचे. त्यांना महिन्याकाठी पंधराशे रुपये नोकरीवर कायम असणारे शिक्षक देत होते, असे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील एक शिक्षिका चक्क मुख्याध्यापकाच्या वर्गावर शिकवत होती. जर मख्याध्यापक असे करत असतील, तर इतरांचे काय, असा सवाल निर्माण होत आहे.
कारवाई होणार
मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त राजू खैरनार म्हणाले की, महापालिकेच्या शाळेत भाडोत्री शिकवत शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर आम्ही पाहणी केली. तेव्हा दोन नोकरीवर नसलेले शिक्षक नोकरीवर कायम असलेल्या शिक्षकांच्या जागेवर शिकवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पंचनामा करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.