मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन हा 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. आज त्यांची मुदत संपल्यानतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तर विरोधकही यावरुन आक्रमक झाले होते. याप्रकरणी बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी लगेचच अटक केली . मात्र पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हाँ सुमारे आठवडाबर फरार होता.अखेर तब्बल 11 दिवसांनी, गेल्या आठवड्यात जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांची नजर चुकवत जयदीप हा त्याची पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. आजा त्याला व आरोपी चेतन पाटील याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
जयदीप आपटे देतोय विसंगत माहिती, सरकारी वकिलांचा दावा
याप्रकरणी सरकारी वकील ॲड तुषार भणगे यांनी माहिती दिली. ‘ आरोपी जयदीप आपटे हाँ विसंगत माहिती देतोय. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 13 तारखेपर्यंत (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात’, असे भणगे म्हणाले.
26 ऑगस्ट रोजी पुतळा कोसळला
आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. या 26 ऑगस्ट रोजी हा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर आपटे हा एक आठवडा फरार होता. तो घरी असल्याचे समजताच कल्याणमधील घराबाहेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली होती.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा दावा सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात केला होता. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे अवशेष जमा करण्यात आले होते. ते गंजलेले होते. पुतळा तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का,याचा तपास करावा लागेल, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.