ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता?; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 07, 2024 | 6:41 PM

शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ममता बॅनर्जी या प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता?; शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Follow us on

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ममता बॅनर्जी या प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी संसदेत पाठवलेले नेते जागरूक आणि मेहनती आहेत. कष्टाळू आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी मतदानाची आकडेवारी सादर करून महायुतीवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत राज्यात  80 लाख मतं पडली, तरीही काँग्रेसचे फक्त 15 उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात 79 लाख मतं पडली म्हणजे काँग्रेसपेक्षा एक लाख कमी तरी देखील त्यांचे 57 उमेदवार निवडून आले, अजित पवार यांच्या गटाला 58 लाख मतं पडली त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. आम्हाला 72 लाख मत पडले आणि आमचे फक्त दहाच निवडू आले.  हे काही तरी आहे, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधी पक्ष प्रभावी बनू नये याची खबरदारी घेतली जात आहे. पण लोकांमध्ये तसं चित्र नाही. लोकांमध्ये उत्साह नाही. लोकांना ते अभिप्रेत नाही. कोणताही उत्साह नाही. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. संसदीय अधिकार असो वा नसो. आम्ही जागरूक राहणार. लोकांमध्ये राहणार, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्या शरद पवार हे मारकडवाडीला जाणार आहेत. यावर देखील यावेळी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी उद्या मारकडवाडीत जातोय. त्या लोकांशी बोलणार आहे. उत्तम जानकर पाहा आणि या ठिकाणचे दोन्ही उमेदवार पाहा. त्यांच्या सभा पाहिल्या. गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी सभा करतोय. यांच्या सभा पाहिल्यावर निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. वातावरण अनुकूल होतं. पण निकाल अनुकूल नाही. पण जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत बोलणार नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे.