विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवरच आल्या असून कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बराच फटका बसला आणि महाविकासा आघाडीची कामगिरी चांगली झाली. याचाच फायद विधानसभेला उठवण्याचाही मविआचा प्लान असून राजकीय पक्ष, नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यभरात विविध दौऱ्यांना सुरूवात झाली आहे. शिवसेना ( उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार असून त्यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. मात्र गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी वरळीकरांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून वरळीकरांनी आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र लिहीत जाब विचारला आहे. ‘ तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणायचं की सलाम वालेकूम? ‘ असा सवालही विचारण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंवर टीका
वरळी विधानसभा मतदारसंघातील एका कोळी बांधवाने आदित्य ठाकरे यांना रोखठोक पत्र लिहीलं असून त्या पत्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना जाब विचारला आहे. गेल्या साडेचार वर्षांत आदित्य यांनी वरळी विधानसभा मतदार संघाकडे लक्ष दिलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्यांना खरमरीत शब्दात सुनावण्यात आलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात ?
‘तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब बोलायचे की सलाम वालेकुम मिया असं बोलायचं असा प्रश्न आम्हाला पडलाय’ अशी पत्राची सुरुवात करण्यात आली आहे. ‘ आम्ही वेडे आहोत म्हणून आतापर्यंत तुमच्या शिवसेनेला मतदान करत राहिलो… हा बाळासाहेबांचा वारस वरळी मतदारसंघ पिंजून काढून सर्वांसमोर आदर्श निर्माण करेल असं वाटलं होतं… पण असं काही झालं नाही. तुम्ही निवडून आल्यावर वरळी विधानसभेकडे थोबाड फिरवलं ते आता निवडणुका आल्यानंतरच दाखवलं ‘ अशा शब्दांत पत्रातून त्यांना सुनावण्यात आलंय. ‘ चार वर्ष तुम्ही आम्हाला लाथाडलं तरी देखील तुम्ही आता येता, तरी आम्ही तुमचं वरळीच्या गल्लीत स्वागतच करतोय. आम्ही रडत असताना डोळे पुसायला तुम्ही नाही आलात तरीदेखील आम्ही तुमचं स्वागत केलं, याला येडेपणा नाही बोलायचं तर काय? साहेब बास झालं आता जाम झाला वेडेपणा! साहेब पाच वर्ष गायब राहून आता किती पण थोबाड दाखवला तरी शहाणा झालेला वरळीकर तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा वेडेपणा करणार नाही’ असं म्हणत शहाणा झालेला वरळीकर तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याचे वेडेपणा करणार नाही असा पत्राचा शेवट करण्यात आला आहे.
आमदार असूनही आदित्य यांनी वरळीकडे विधानसभा मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि आता निवडणुका आल्यावर ते पुन्हा मतदारांना भेटायला जात आहेत, याचा राग सामान्य लोकांमध्ये असून या पत्रातून त्या व्यक्तीने सर्व वरळीकरांच्या भावनाच बोलून दाखवल्या आहेत, अशी चर्चा आहे. त्यांच्या या पत्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून सर्वत्र याच पत्राची चर्चा सुरू आहे.