जालना | 29 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शनिवारी मान्य करण्यात आल्या. त्यानंतर वाशीमध्ये त्यांनी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. नंतर भव्य सभाही घेतली. मागण्या मान्य झाल्याने मुंबईत न येताच त्यांनी नवी मुंबईतच मोर्चाची सांगता करत परतीचा रस्ता धरला. मात्र जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी ते युद्धात जिंकले, तहात हरले अशी टीका सध्या सोशल मीडियावर होत आहे. मराठा आरक्षणाबाबत फसवणूक झाल्याच्या पोस्ट्सही काही जण शेअर करत आहेत.
तर राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे सांगत नारायण राणे हेही आज मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. ‘राणे मराठा समाजाच्या अन्नात माती कालवायला बघत आहेत’ असा आरोप करत त्यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले. तसेच सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मागवल्या आहेत, तिथे आक्षेप नोंदवा असंही त्यांनी सुनावलं.
नारायण राणेंवर टीकास्त्र
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईच्या दरात आल्यानंतर सरकारने तातडीने निर्णय घेतला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचे केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे ट्विट नारायण राणे यांनी केले. त्यावरच बोलताना मनोज जरांगे यांनी राणेंवर टीका केली. ‘ आपण बनवलेला कायदा किती मजबूत आहे हे समजून घेतले पाहिजे. ते एकटेच आहेत, जे मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बघत आहेत’, अशी टीका त्यांनी केली.
मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे समाजात दुही दाखवू नका, असे त्यांनी सुनावले. एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असेही जरांगे यांनी नमूद केले.
सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा…
सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबद्दलही मनोज जरांगे बोलले. सोशल मीडियावर अध्यादेशात नवं काहीच नाही, जुन्याच गोष्टी दिल्या गेल्यात असं म्हटलं जात आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चाळे सुरू आहेत ना, अमकं झालं आणि तह झाला. मराठा जिंकून आले, कायदा झाला, डोकं आहे का? गोरगरिबांसाठी झाला, तुला विचारलं नसेल म्हणून तुझं दुखत असेल अशी टीका त्यांनी केली.
फेसबुकवर बोलण्यापेक्षा इकडं येऊन बोला. माझी सर्व अभ्यासक आणि तज्ज्ञांना विनंती आहे की, सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडल्या आहेत तिथे म्हणणं मांडावं. त्यांनी कायदा आणखी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करा, असं म्हणणं मांडा, असे जरांगे पाटील म्हणाले.