मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आपण मुख्यमंत्री होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्री होणार नाही. मला त्या लफड्यात पडायचे नाही. मात्र, मी गेम करणार. आमची सत्ता आली तर सात आठ उपमुख्यमंत्री करणार आहे. शेतकऱ्याला मंत्री करणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मनोज जरांगे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आता राजकारणात उतरलो नाही. मात्र आरक्षण मिळाले नाही तर संपूर्ण मराठा समाज विधानसभेला पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही. मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो. नाव घेतलं नाही. विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला.
आमच्यातही खुंखार लोक आहेत
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. मराठ्यांनी कधी जातीयवाद केला नाही. आता निवडणूक संपल्याने हे लोक गुरगुर करत आहेत. मला धमक्या दिल्या. मात्र मी तक्रार देणार नाही. आम्ही एवढे कच्चे नाहीत. धनंजय मुंडे जाणीव ठेवतील असं वाटले होते. मात्र आता चार दिवसात काय झाले आहे माहीत नाही. निवडणूक झाल्यावर आमच्या पोरांना मारहाण झाली. गुन्हे दाखल करण्यात आले. मला बीडमध्ये फिरू देणार नाही असे सांगण्यात आले. मात्र तुम्हाला राज्यात फिरायचे आहे. हे लक्षात ठेवा. आमच्यातही खुंखार लोक आहेत. पण आम्ही शांत आहोत, असा इशाराच त्यांनी दिला.
माझं एकच सांगणं आहे…
येवल्याचा म्हणाला, मराठे गाडी अडवत आहेत. पंकजा यांची गाडी अडवतात आणि प्रणिती शिंदे यांची गाडी अडवत नाहीत. वंजारी आणि मराठ्यात काहीही वैर नाही. पंकजा यांची गाडी अडवली तर काय झालं? तुम्ही मोठे नेते आहात. मागण्यांसाठी तुमची गाडी अडवली असेल. तुम्ही समजून घ्यायला हवे. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्ही चालवत आहात. तुम्ही लेकरांची समजूत काढली पाहिजे. गाडी अडवली म्हणून तुम्ही बदला घेत आहेत का? मुंडे भावंडांनी एकत्रित येवून जातीय सलोखा राखण्यासाठी दोन्ही समाजाची बैठक घ्यायला हवी. आता निवडणूक होऊन गेली हे गुरगुर करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाना माझं एकच सांगणं आहे, मला राजकारण करायचं नाही. तुम्ही तुमच्या लोकांना शांत बसवा. कुणालाही आमच्या विरोधात बोलण्यास लावू नका, असं जरांगे म्हणाले.