मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असल्याचा दावा करणारे बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर मोठी टीका केली आहे. आपण साल 2006 पासून मराठा आंदोलकांच्या बैठका हजर असायचो, जरांगे यांच्या मनमानीला कंटाळून आपल्या जीवावर उदार होऊन त्यांना विरोध करतोय असे अजय महाराज बारस्कर यांनी काल पत्रकार परिषदेत जरांगे यांच्यावर टीकास्र केले आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा जरांगे यांच्यावर टीका केली आहे. बारस्कर यांची क्लिप आपण पाहीली होती. त्यावरुनच आपण विधानसभेत भाषण केले होते अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेल्यावर सर्वोच्च न्यायालयात टीकणार नाही. त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी जरांगे यांची मागणी आहे. मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर जरांगे खूष नसून त्यांनी सगे-सोयरे नोटीफिकेशनची अंमलबजावणी करुन ज्यांची कुणबी नोंद नाही त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावेत या मागणीसाठी येत्या 1 मार्च रोजी वयस्कर मंडळी उपोषणाला बसतील, 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्तो रोको आंदोलन होईल तर 29 फेब्रुवारीला राज्यभर रास्तारोकोचा इशारा दिला आहे.
जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर काल पत्रकार परिषदेत प्रचंड टीका केली आहे. जरांगे कोणालाही विश्वासात न घेता परस्पर बैठका घ्यायचे. त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केल्याने आपण त्यांना सोडल्याचे बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, अजय महाराज बारस्कर यांना आपण पक्षातून काढून टाकल्याचे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी पत्रक काढले आहे. पक्षात कोणीही मराठा आंदोलनासंदर्भात प्रतिक्रीया देऊ नये असे बच्चू कडू यांनी आवाहन केले आहे.
जरांगे मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना आईवरुन शिव्या देत असतात असे भुजबळ यांनी विधानसभेतील भाषणात म्हटले होते. आता बारस्कर यांची क्लिप आपण पाहीली होती त्यावरुनच आपण विधानसभेत बोललो होतो. बारस्कर 2006 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढताय ते जरांगे सोबत असायचे. त्यांच्या गुप्त बैठकीतील बेताल वक्तव्यांना कंटाळून ते बोलतायत. जरांगेना काही कळत नाही विनाकारण गावबंद करा म्हणत आहेत. वयस्कर लोकांना उपोषणाला बसवत आहेत. त्यांना काही झाले तर जबाबदार कोण असाही सवाल मंत्री भुजबळ यांनी केला आहे. जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत ठरवावे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु जरांगे गैरसमज निर्माण करत आहेत.. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते वाटेल ते बोलतात. 10 तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना त्यांनी विचारले नव्हते, स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले. हे सर्व श्रेय वादासाठी सुरु आहे.
सरसकट आरक्षण देता येणार नाही. सगे-सोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही. कोर्टात याला विरोध होणार आहे. मराठा मतांना जरांगे भडकवतील, आपली मते विरोधात जातील म्हणून सरकारकडून सावध भूमिका घेतली जात आहे. बारावीची परीक्षा सुरू आहे, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यांवर उतरा असे सांगत आहेत.