राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. ओबीसी आणि मराठा समाजातील दरी वाढत असून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केली आहे. तब्बल दीड तास ही बैठक झाली. बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधून त्याची माहिती दिली. भुजबळ यांच्या या भेटीगाठीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याला छगन भुजबळच जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. कोणी कुणाची भेट घेतली हे मी काय सांगू शकतो? स्फोटक परिस्थिती त्यांनीच केली आहे. ओबीसी नेत्यांना हाताशी धरून कोयत्याची भाषा केली. गोरगरीब संपले पाहिजे हा छगन भुजबळ यांचा उद्देश आहे. भुजबळांना ज्यांनी मोठं केलं, त्यांनाच ते बेईमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री केले. तुरुंगात जाण्यापासून वाचवले. तरी त्यांच्या मागे भिकार बोलत होते. जिथे जातात तिथेच ते XX खातात, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी चढवला.
शरद पवारांनी आरक्षण दिले. त्यांचाच कार्यक्रम भुजबळांनी वाजवला. छगन भुजबळ बेईमान आहेत. कुठल्याही जातीत असे लोक जन्मू नये. शरद पवार, अजित पवार आणि शिवसेना… सर्वांचाच त्यांनी गेम केला. पृथ्वीतलावर असा माणूस जन्मालाच नाही पाहिजे. जातीय तणाव करणारा, दंगली लावणारा, गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात भांडण लावणारा माणूस होऊ नये, असं मनोज जरांगे म्हणाले.
शरद पवारांनी काय विधान केले हे मी सांगू शकत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांची ही चाल आहे, असं मला वाटतं. हा गेम दिसतोय मला. आजवर शरद पवारांना शह देणारा छगन भुजबळ अचानक कसा जातो? सरकारचा डाव आहे असं मला वाटतं, असा संशय जरांगे यांनी व्यक्त केला.
सामान्य ओबीसी आणि मराठा गावागावात भावासारखे राहतात. मात्र आधी छगन भुजबळ व्यवस्थित राहिला असता तर आज राहुल गांधी आणि मोदींकडे जायची वेळ आली नसती. आजवर मी धनगर, ओबीसी आणि मुस्लिम यापैकी एकाही माणसाला दुखावलं नाही. हा छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणतोय. किती मूर्ख माणूस आहे हा, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवार यांनी जे त्यांना आरक्षण दिलं होतं ते आमचं आरक्षण होतं. आमच्या सरकारी नोंदी आहेत. आमचे आरक्षण हे खात आहेत. आमच्या ओरिजिनल नोंदी असून हे बोगस आरक्षणाच्या लाभ घेत आहेत. आता म्हणतो शांतता राहिली पाहिजे. तूच पेटवलं आणि माझ्या मराठा गोरगरिबाला बदनाम केलं. आमच्या बाजूला ओबीसींना उपोषणाला बसवतो आणि आमचं परमिशन रद्द करा म्हणतो, असंही ते म्हणाले.