मनोज जरांगे पाटील फ्रॉड, तो राष्ट्रवादीचा माणूस, कुणी केला आरोप? 18 वर्षांचा घटनाक्रम जाणून घ्या

| Updated on: Feb 25, 2024 | 10:06 PM

2019 पासून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हापासून ते राष्ट्रवादीत आहेत. आता जरांगे सोबत आहेत ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत. गळ्यात कवड्याच्या माळा टाकून लोकांना हात दाखवतात. हार तुऱ्यांसाठी हा माणूस भुकेला आहे.

मनोज जरांगे पाटील फ्रॉड, तो राष्ट्रवादीचा माणूस, कुणी केला आरोप? 18 वर्षांचा घटनाक्रम जाणून घ्या
MANOJ JARANGE PATIL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कोणत्याही पक्षाचे आपले संबध नाहीत असे सांगत आहेत. मात्र, जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस आहे. शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील याचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केलाय. जरांगे पाटील यांनी महिलांना ढाल म्हणून पुढे केले आहे. जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यांनी जिथे जिथे आंदोलन केले तिथे राष्ट्रवादी सोबत होती. स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांचा वापर कसा करायचा हे त्यांना माहित आहे. मुलांचा वापर करतात आणि प्रसिद्धि मिळवतात असा गोप्यस्फोटही बाबुराव वाळेकर यांनी केलाय.

मनोज जरांगे याच्यासोबत 17 ते 18 वर्षांपासून काम करतोय. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघडं करणार आहे असे बाबुराव वाळेकर म्हणाले. 2011 ला त्यांनी एक संघटना उघडली. मी त्या संघटनेत होतो. कोपर्डीची घटना झाली त्यावेळी जरांगे यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं, मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले. त्या बैठकीला आम्ही 10 ते 12 जण होतो, असे वाळेकर यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी त्या बैठकीत आरोपीवर हल्ला करायचा असं सांगितले. मढीजवळ रेस्टहाऊसला आम्हाला ठेवलं. त्यातील अर्धेजण तेव्हा मागे फिरले. आम्ही 4 जण सोबत राहिलो. आमच्यातला एक राजू चांगल्या नोकरीला होता. त्याला भावनिक करुन राजी केलं. आरोपी अहमदनगर कोर्टात आला. आम्ही चौघे वेगळ्या साईटला थांबलो आणि जरांगे पाटील एका बाजूला उभे राहिले. आम्ही 4 जणांनी आरोपीवर हल्ला केला. पण, जरांगे पाटील यांनी तेथून पळ काढला असा आरोपही बाबुराव वाळेकर यांनी केला.

जरांगे पाटलांवर 420 चा गुन्हा का झाला तर फसवल्यामुळे. 10 ते 12 जणांचे संसार त्यांनी जरांगे पाटलांनी उध्वस्त केले. आम्ही जेलमध्ये गेलो. स्वतः प्रसिध्दी मिळवली. पण आम्ही जेलमध्ये होतो. आम्हाला काहीच मिळाले नाही. जरांगे पाटील हा फ्रॉड माणूस आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला घटनेतील आम्ही आरोपी आहोत. आमच्याकडे भयानक पुरावे आहेत. वेळ पडली की तेही देईन, असा इशाराही त्यांनी दिला.

गळ्यात कवड्याच्या माळा टाकून लोकांना हात दाखवतात. हार तुऱ्यांसाठी हा माणूस भुकेला आहे. आत्महत्या केलेल्या गावात शोककळा असताना भेटायला जायचे आणि सत्कार घ्यायचे असे त्याचे उद्योग आहेत. जरांगेच्या आमिषाला कोणी बळी पडू नका. 2019 पासून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हापासून ते राष्ट्रवादीत आहेत. आता जरांगे सोबत आहेत ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत असा थेट आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांशी आमचा काही संबंध नाही. एक लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर कधीच आरोप केले नाही. समाजासाठी प्रामाणिक काम कराल तर आम्हीही सोबत राहू. आम्ही प्रमाणिकपणे काम करतोय. समाज कुठे भरकटु नये हा आमचा उद्देष आहे, असेही वाळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.