Manoj Jarange Patil on reservation Increased : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जाती-जमातीतील लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वाद घालताना दिसत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या, केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल’ असे शरद पवारांनी म्हटले. आता यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांनी आरक्षणाबद्दल केलेल्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. “मी त्यांच्या मागणीचे कौतुक करतो. पण आमचं म्हणणं काय आहे, हे तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत. आम्ही काय म्हणतो ते आधी समजून घ्या, उगाचच तुमचे घोडे दामटू नका”, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“शरद पवारांनी केलेल्या मागणीचे मी कौतुक करतो. मर्यादा वाढली तर मराठा समाज ओबीसीत येणार आहे. परंतु आमचे म्हणणे काय आहे, हे तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत. महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांनीही राजकीय स्वार्थासाठी बोलू नका. तुम्ही अगोदर आमच्या भावना, दुःख समजून घ्या. गोरगरिबांचे म्हणणे समजून घ्या. उगाचच तुमचा गाडा रेटू नका. तुमच्या मनासारखे शब्द वापरू नका. तुमच्या मनासारखे तुम्ही वागणे बंद करा, लोकांचे म्हणणे आणि भावना जाणून घ्या”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आमचे म्हणणे आहे की मराठ्यांना तुम्ही 27 टक्के ओबीसी आरक्षणात आणि 50 टक्क्यांच्या आत आम्हाला घ्या. मग तुम्ही कितीही मर्यादा वाढवा. तुम्ही ते का म्हणत नाही? आधी तुम्ही मराठ्यांना ओबीसीत टाका. आम्ही हे सांगतो ते करा. तुमच्यावरही नाराजी पसरायला लागली आहे. तुमची केलेली मागणी योग्य आहे, मर्यादा वाढली तरच आरक्षण टिकणार आहे. अन्यथा ते टिकणार नाही. परंतु आधी आम्ही काय म्हणतो ते जाणून घ्या, तुमचे घोडे दामटू नका”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“निवडणूक जवळ आली की फुसके बार सोडून द्यायचे आणि म्हणायचे आम्ही मागणी केली होती, अशी मागणी आम्हाला नको. आधी मराठ्यांना 27 टक्के ओबीसी आणि 50 टक्क्यांच्या आत घ्या. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या आणि मर्यादा वाढवा”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
“मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे कधीही आचारसंहिता लागू देणार नाहीत. हे मी 100 टक्के सांगतो. देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, त्यांना जर सत्तेतील अस्तित्व घालायचे नसेल, भाजप संपवायचे नसेल, तर ते कधीच आचारसंहिता लावणार नाहीत. त्यांना जर स्वतःला आणि पक्षाला संपवून घ्यायचे असेल, तर ते आचारसंहिता लावतील. मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय ते निवडणूक घेणार नाहीत आणि मला ती खात्री आहे. मला याची पूर्णपणे खात्री आहे. यासाठी जर 10 ते 20 दिवस निवडणूक पुढे ढकलायची वेळ आली, तर ते ढकलतील”, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
“पण जर त्यांनी तसे केले तर येणार काळ त्यांना नक्कीच धडा शिकवेल. जनता त्यांना असा धडा शिकवेल की ते परत राजकीय प्रवासात येणार नाही आणि हे आपले चॅलेंज आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.