मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
25 जानेवारीपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार, मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही तर काय होतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही ते माहीत आहे. आता फक्त खांदे बदलले आहे, पण आमच्यात सरळ करण्याची ताकद आहे त्यांना दिसून येईल 25 तारखेला महाराष्ट्रात काय होईल ते. त्यांचे भागले म्हणून ते आरक्षणाबाबत बोलत नाहीत, त्यांना पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, 25 जानेवारीची वाट पाहिली तर राज्यातील सर्व समाज अंतरवालीला येणार आहे, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, कुणबी नोंदींची शोध घ्या, काही कक्ष बंद पडले आहेत, ते पुन्हा सुरू करा. कुणबीचे प्रमाणपत्र वितरित होत नाहीत. आम्ही याबाबत सरकारला निवेदन दिलं आहे. तुम्ही सत्तेत असाल बलाढ्य असाल मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे तो अध्यादेश पारित करावा. हैदराबाद गॅजेट लागू करा, सगे सोयरेची अंमलबजावणी करा. या सर्व मागण्या 25 जानेवारीच्या आत मान्य करायच्या आहेत. नसता पश्चतापाची वेळ येईल, तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येतला 11 दिवस झाले आहे, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार आहे. त्याबरोबरच सरकारबरोबर देखील चर्चा करणार आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.