राज्यात आचारसंहिता लागली पण राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. त्यामुळे गावागावातील मराठा समाजाचा हिरमोड झाला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटीलही चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. मराठा समाजाला डावलल्यावर काय होतं? हे सत्ताधाऱ्यांना दाखवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. जरांगे पाटील यांनी आज दुपारी अंतरवली सराटीत तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उमेदवार द्यायचे की उमेदवार पाडायचे? याचा फैसला करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस अंतरवली सराटीत मोठ्या घडामोडींना वेग येणार असल्याने सर्वांचं लक्ष मनोज जरांगे यांच्याकडे लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. आज एक मार्गदर्शनासाठी ठराविक अभ्यासकांची बैठक पार पडणार आहे. लढायचं की पाडायचं याबाबत तज्ज्ञ निर्णय घेणार आहेत. निवडणूक लढवायची ठरवली तर काय केलं पाहिजे हे आम्हाला माहीत नाही राजकारणातला खेळ माहीत नाही, आपण यात नवीन आहोत. ज्यांना राजकारणातील अनुभव आहे, त्यांची आज बैठक बोलावली आहे. आज दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे. तज्ज्ञ मंडळी त्यांचे अनुभव आम्हाला शेअर करतील. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेऊ, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा समाज वाट पाहतोय
उद्या निर्णायक बैठक पार पडणार आहे. उद्या शेवटची बैठक आहे. या बैठकीत निवडणूक लढायचं ठरलं तर फॉर्म भरायचे आहेत, नाही ठरलं तर उमेदवार पाडायचे आहेत. 13 महिन्यापासून मराठे एक आहेत. वेळ कमी आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत. आम्ही काय निर्णय घेणार याची घराघरात मराठा समाज वाट पाहत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
लढणं होईल किंवा पडणं होईल
राज्यातील मतदारसंघांवर किती प्रभाव आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं. उद्या सगळं समोरासमोर फायनल होईल, जो काही एकमताने निर्णय होईल तो होईल. उमेदवार उभे करायचे असो की पाडायचे असो, उद्या शेवटची बैठक होईल, त्याच्यापुढे वेळ नाही. समाजाला मला वेळ आहे पण प्रक्रियेला वेळ नाही. मी तयार आहे, समाज सुद्धा तयार आहे, फक्त समाजाला सांगायचं आहे. लढायचं ठरलं तर प्रचाराला टेन्शन नाही. म्हणून तीन महिन्यापासून सांगतोय तुम्ही सावध रहा. सगळ्यांनी आपले कागदपत्र काढून ठेवा. उद्या लढणं होईल नाहीतर पाडणं होईल, असंही त्यांनी सांगितलं.
काहीच लफडं नको
स्वबळावर लढणार की युती करणार? असा सवाल त्यांनी करण्यात आला. त्यावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. ते सगळं उद्या ठरेल. कुणाच्या सोबत जाणार नाही, सगळे लोक यांना कदरले आहेत हे मात्र नक्की. काहीच लफडं नको. ठरलं तर अपक्ष दणका हाणून द्यायचा. या पाच वर्षात सहाचे सहा पक्ष सत्तेत बसलेत. हे देशात पहिल्यांदाच झालं आहे. हे मारेकरी आहेत, अशी टीका त्यांनी केली.