बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील काही आरोपी फरार होते. यातील दोन आरोपींना आज पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोप कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर दुसरीकडे आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना आज पुण्यातून अटक करण्यात आली. तर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड देखील पुण्यातच सीआयडीला शरण आला होता. यावर बोलताना सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात? आरोपींना पुण्यात कोणी सांभाळलं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माणसांच्या हत्या होत असल्यानं सहन होत नाही, एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही. धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारलं तो जातीयवाद नाही का? आमचे लोक मारून तुमचे आरोपी लपून ठेवा.
यापुढे जर हल्ला झाला तर उत्तर जशाचं तसं उत्तर द्या, न्याय आरक्षण मागितलं की आम्ही जातीयवादी? धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतात तर तुम्ही त्यांना धमक्या देतात. खंडणी, हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट व्हावी, संतोष देशमुखांना न्याय दिल्याशिवाय मागे हटायचं नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.