मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या

| Updated on: Nov 04, 2024 | 6:20 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहनही केलं.मनोज जरांगे पाटील यांनी अचानक घेतलेल्या या युटर्नमुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचंच टेन्शन अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, आम्ही मुस्लिम आणि दलित समाजामधील उमेदवारांची यादी मागितली होती. मात्र ती आम्हाला प्राप्त झाली नाही. एकट्या जातीच्या बळावर कुठलीही निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत.

पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारण आमचा काही खानदानी धंदा नाही, त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ज्यांनी चारशे पारचा नारा दिला होता त्यांची काय अवस्था झाली ते संपूर्ण देशानं बघितलं आहे. आम्ही जरी माघार घेतली असली तरी मतदार म्हणून मराठा समाजाचा दबदबा कायम राहील यामध्ये काहीही शंका नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या माघारीचा फायदा कोणाला?

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं होतं. याचा मोठा फटका हा भाजपला बसला. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत, त्यातील तब्बल सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील जरांगे फॅक्टर चालल्याचं पहायला मिळालं. सोलापूर, माढा, अहमदनगर यासारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

दरम्यान जर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले असते तर मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन झालं असतं. त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला असता. मात्र जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं आता मुस्लिम आणि दलित मतदान हे महाविकास आघाडीलाच होण्याची शक्यता आहे. याचा फटका हा महायुतीला बसू शकतो.