सोलापूर | 3 नोव्हेंबर 2023 : राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाने मराठा आरक्षणासाठी मागितलेला 2 जानेवारीचा वेळ देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले नऊ दिवसांचे उपोषण काल अखेर सोडले. मनोज जरांगे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असताना आज त्यांची कन्या, पत्नी आणि लहान बहिणीने सोलापूर येथील तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेत आई भवानीला गाऱ्हाणे घातले. मराठ्यांना लवकर आरक्षण मिळू दे आणि वडीलांची तब्येत बरी होऊ दे अशी प्रार्थना जरांगे यांची कन्या पल्लवी हीने देवीकडे केली.
सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा वेळ देत मनोज जरांगे यांनी नऊ दिवसानंतर अखेर काल आपले उपोषण सोडले आहे. त्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मराठ आंदोलकांनी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज जरांगे यांची कन्या, पत्नी आणि त्यांची धाकट्या बहिणीने तुळजापूरच्या भवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी देवीची कवड्यांची माळ, देवीची साडी चोळी हार देऊन पुजारी विशाल आणि सचिन रोचकरी यांनी जरांगे यांच्या कुटुंबाचा सत्कार केला. यावेळी जरांगेच्या कुटुंबियांनी तुळजापुरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना निवेदन देत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली.
मनोज जरांगे यांची कन्या पल्लवी हीने वडीलांची अजून भेट झाली नसल्याचे तसेच फोनवरही बोलणे झाले नसल्याचे सांगितले. आपल्याला विश्वास आहे की सरकार लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण देईल आणि पप्पांच्या या 20-25 वर्षांच्या लढ्याला यश येईल असे पल्लवी हीने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले. देवीला एकच साकंड घातलं की मराठा समाजाला आरक्षण मिळू दे आणि आमच्या लढ्याला यश मिळू दे असे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांची लहान बहीणीने भय्याला बळ मिळू दे आणि लढ्याला यश मिळू दे म्हणून देवीच्या चरणी आल्याचे सांगितले.