31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अर्थात नववर्ष अशा दोन्हींचे औचित्य साधत न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे. सेलिब्रेशनसाठी मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूर आणि वांगणी भागातील रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसवर मुंबई, ठाण्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यंदाही महिनाभर आधीपासूनच 80 टक्के रिसॉर्ट आणि फार्म हाऊसचं बुकिंग फुल्ल झालं आहे.
निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई आणि ठाणेकर बदलापूर, वांगणी, कर्जत परिसरात येत असतात. थर्टी फर्स्टसाठी या भागातील रिसॉर्ट्स, फार्म हाऊस, कृषी पर्यटन केंद्रांमध्ये महिनाभर आधीच बुकिंग केलं जातं. यंदाही महिनाभर आधीच 80 टक्के फार्म हाऊस, रिसॉर्ट्स हाऊस फुल्ल झाली आहेत. पर्यटकांना थर्टीफर्स्टचा मनमुराद आस्वाद घेता यावा, यासाठी आयोजकांनीही कंबर कसून तयारी केली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, तसंच खवय्यांसाठी स्पेशल मेन्यू असा बेत आखण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना निखळ आनंद घेता यावा, यासाठी आयोजकांकडून खास तयारी केली जात असून रिसॉर्ट आणि फार्म हाऊस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
नाताळच्या सुट्ट्यांमुळे शेगांव सह जिल्ह्यातील पर्यटन स्थळी गर्दी
ख्रिसमस अर्थात नाताळचा सण, वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरूवात, आणि त्यामुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेला शेगाव येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी शेगाव येथे मोठी गर्दी केली आहे. यासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश, राजस्थान , छत्तीसगड येथून सुद्धा भाविक शेगावात दाखल झाले आहेत. सलग सुट्यांमुळे लाखो भाविकांनी शेगावमध्ये गर्दी केली असून त्यामुळे हॉटेल्स, लॉज , रेस्टॉरंट्सही फुल्ल बूक झाली आहेत. शिवाय ा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेला लोणार सरोवर तसेच ऐतिहासिक स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे सुद्धा पर्यटकांनी गर्दी केली आहे
खंडाळा बोरघाटात वाहतूक कोंडी
ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर घराबाहेर पडले असून, परिणामी मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर मोठी वाहतूक कोंडी खंडाळा बोरघाटात बघायला मिळाली. अचानक वाहनाच्या संख्येत वाढ झाल्याने या वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत असून किमान चार ते पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या.
लोणावळ्यातही तूफान गर्दी
ख्रिसमस, सुट्ट्या, लागून आलेला वीकेंड यामुळे लोणावळा शहरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. नाताळाच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पुणे, मुंबईसह देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. येथील लायन्स आणि टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवण्यासाठी इथे आल्याचं पर्यटकांनी सांगितलं. अनेक पर्यटक हे कुटुंबासह लोणावळ्यात दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद घेतायत. नाताळ आणि नवीन वर्षे साजरी करण्यासाठी पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळतात. दरवर्षी येथे पर्यटक हजारोंच्या संख्येने येत असतात. यंदाच्या वर्षी देखील नाताळ सुट्टी एन्जॉय करण्यासाठी लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे.
संपूर्ण भारतातून लोणावळ्यात पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत सुरू आहे. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने पोलीस प्रशासन ही सज्ज झालाय. या दरम्यान पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही. याची दक्षता लोणावळा पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.