बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. तर दुसरीकडे या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासोबतच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. आता यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपही केले. धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत. मी सरकारपेक्षा भारी आहे. मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुडदे पाडणार, जमिनी बळकवणार, प्लॉट बळकवणार असं काहीतरी धनंजय मुंडे वाटत आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंना वेगळं चॅलेंज द्यायचं वाटतंय, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“धनंजय देशमुख हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माझी तब्येत खराब होती. त्या अनुषंगाने ते भेटायला आले होते. न्याय घेण्यासाठी त्यांची तळमळ आहे. धनंजय मुंडेंच्या टोळीने त्यांचे पोट भरलं नाही. अजूनही आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करत आहेत. राज्यात नवीन पायंडा धनंजय मुंडेंच्या टोळीने सुरू केला आहे. आंदोलन करणं, गुंडगिरी करणं या राज्यात नवीन योजना राबवण्यासारखा आहे. दहशतवादी लोकांना प्रशिक्षण दिल्यासारखं हे असं उगरटपणाने वागायला लागलेत. शेवटी कुटुंब गाव भयभीत होतं. जिल्हा भयभीत करायला लागले. दहशत माजवायला लागले. धनंजय मुंडेंनी या डोळ्यांना आसरा दिला असं वाटतं. खून करून दहशत माजवा, गुंडगिरी करा, तोडफोड करा, दंगली करा हे उन्माद दाखवायला लागले. कुटुंब भयभीत आहे. त्यामुळे त्यांना धीर दिला. आम्ही सोबत आहोत, समाजसोबत आहे. शेवटी समाजाचा संयम सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीला जड जाईल”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेणे गरजेचे आहे. त्यांच्या डोळ्यादेखत सरकारमधल्या मंत्र्यांकडून अशा घटना होणार असल्या तर सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही लाजिरवाणी गोष्ट आहे हे साधं-सुधं नाही, एक प्रकारे फडणवीस साहेबांना आव्हान आहे. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनाही चॅलेंज दिले जातं. धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहतं आहेत की मी सरकारपेक्षा भारी आहे. मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुडदे पाडणार, जमिनी बळकवणार, प्लॉट बळकवणार असं काहीतरी धनंजय मुंडेंना करायचे आहे. त्यांना देवेंद्र फडणीसांना वेगळे चॅलेंज द्यायचं वाटतंय”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस साहेबांनी अॅक्टिव्ह होणं गरजेचे आहे. या गुंडगिरीच्या टोळीचा समूळ नायनाट करणं आवश्यक आहे. याबद्दलच्या चौकशीसाठी समिती नेमली चांगली गोष्ट आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. SIT CID या सगळ्यांनी मिळून ही टोळी मुळासकट उपटून काढली पाहिजे. हे जर सरकार पक्षात राहून सरकारला चॅलेंज करत असेल तर अवघड आहे. तुम्ही खून करता आणि सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करता. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल मनोज जरांगेंनी केला.
“एकदा धनंजय मुंडे म्हटला होता, त्याची क्लिप आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं वाकड करू शकत नाही. कोणाच्या जीवावर हा माज आणि मस्ती आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखी एक काम केलं पाहिजे, इन्कम टॅक्सच्या सगळ्या रेड मारला पाहिजे. सीबीआयच्या चौकशी केल्या पाहिजे. मी फडणवीस साहेबांना सर्व सांगतो हे विषारी आहे, त्याचं विष काढून घ्या. हे राज्यावर विषारी प्रयोग करून पाहत आहे. जर याच्यात हा यशस्वी झाला तर फडणवीस साहेब तुम्हाला पण गिळेल. राज्याला कलंक लावून जाईल”, असेही मनोज जरांगे म्हणाले.