मनोज जरांगे यांनी उपसलं शेवटचं हत्यार… मोठी घोषणा करून राजकीय पक्षांना फोडला घाम

| Updated on: May 18, 2024 | 12:06 PM

नारायण गडावरील सभेसाठी मार्चमध्ये तयारी करा म्हणून सांगितलं. पण काही कारणाने झाली नाही. बीडमध्ये मोठा दुष्काळ आहे. मोठ्या प्रमाणावर समाज तिथे आला तर त्यांची गैरसोय होऊ शकते. तिथे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळेच आम्ही दोन पावलं मागे आलो आहोत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी उपसलं शेवटचं हत्यार... मोठी घोषणा करून राजकीय पक्षांना फोडला घाम
manoj jarange
Follow us on

आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही. मात्र, आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांच्या या मोठ्या घोषणेमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी निवडणूक लढणार आहे. राज्यातील 288 जागांवर उमेदवार देणार आहे, असं सांगतानाच लोकसभेच्या निवडणुकीत एक झालं. मराठा एक झाला. मोदींना गोधड्या घेऊन महाराष्ट्रात यावं लागलं. चार पाच नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आंबेडकरांबाबत नंतर सांगू

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत की नाही हे वेळ आल्यावर सांगेन. आता सांगणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच आपली प्रकृती बरी असल्याचंही ते म्हणाले. माझी प्रकृती सध्या चांगली आहे. दौरा मोठा झाल्याने अंग थर थरत होतं. दोन ते तीन दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. आता तब्येत बरी आहे. कोणीही रुग्णालयात येवू नये. प्रकृती ठीक झाल्यावर मी उपोषण सुरू करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून सभा रद्द

नारायण गडावर होणारी जगातील सर्वात मोठी सभा रद्द का करण्यात आली याची माहितीही त्यांनी दिली. नारायण गडावर काहीही तयारी नव्हती. तिथे पाण्याची टंचाई होती. त्यामुळे सभा स्थगित करण्यात आली आहे. सभेची पुढची तारीख कळवली जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भावनिक होऊ नका

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. नाशिकमध्ये मी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट फिरल्या. मात्र मी कुणालाही पाठिंबा दिला नाही. दुसरा निवडून येईल आपल्यात नाराजी नको. पाचव्या टप्प्यातील ही निवडणूक आहे. भावनिक होऊ नका. हे लोक आता पाया पडतील. मात्र आपल्या मुलांच्या बाजूने राहा. भावनिक होऊन कुणाच्या मागे जाऊ नका. लेकरांना न्याय मिळवण्यासाठी ताकतीने उभे रहा, असं आवाहन त्यांनी केलं.