साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमधील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली आहे. या सभेतून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘ आपल्याला नाकारलं आहे, टार्गेट केलं जातंय. सावध व्हा ‘ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ‘ जर न्याय मिळाला नाहीच तर तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या समुदायासाठी आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल.. त्याशिवाय काही पर्यायच नाही ‘ असा थेट इशाराही जरांगे यांनी दिला.आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय होत असतील या राज्यातील समाजावर अन्याय होणार असेल तर लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावच लागणार, असे ते म्हणाले.
तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहू शकत नाही
मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहागिरदाराची औलाद येऊ दे, आता झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचे नाही. कुणावर अन्याय करायचे नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करायला शिका. तुम्हाल स्वसंरक्षण करावंच लागणार आहे,असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. आमचा दोष नेमका काय आहे, ते कुणालाच सांगता येत नाही. मायबापहो लेकरं वाचवा रे, या राज्यातील समाज वाचवा. लक्षात असू द्या मायबाप हो, सोन्यासारखे लेकरं वाचवा, समाज वाचवा. माझ्या समाजातील समाजाला खाली मान घालावं लागेल असं वागू नका. स्वत:च्या लेकराची मान उंचावेल असंच आपलं पाऊल असलं पाहिजे. कोणी कुणाचं नाही. तुमचे हाल होत आहेत. तुम्हाला वेदना होत आहेत. तुमचे लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहेत. त्यांची इच्छा आहे, आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, पण आपली इच्छा आहे ते घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. आपल्याविरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला डावललं जात आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मला फक्त एकच वचन द्या
मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणार नाही हा गडावरून शब्द देतो असं वचन जरांगे पाटील यांनी दिलं.