“निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले”, मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले “लोकांमध्ये राहिला नाहीत तर…”

| Updated on: Nov 25, 2024 | 3:39 PM

मराठ्यांनी त्यांना पाच वर्षे हाताळलं आहे, त्यामुळे आता हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय..? नाही झाले काय.? आम्हाला त्याबद्दल कोणतेही सोयर सुतक नाही", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले, मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले लोकांमध्ये राहिला नाहीत तर...
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

Manoj Jarange Patil On Maharashtra Assembly Elections : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. तर महाविकासाआघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपला आहे. मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आम्ही देशात कधीही झाले नाही, असे भव्य आणि मोठे सामूहिक उपोषण करणार आहोत, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “सत्ता, सत्ता असते, त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत, त्याचे आम्हाला काही वाटत नाही. मराठ्यांनी त्यांना पाच वर्षे हाताळलं आहे, त्यामुळे आता हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय..? नाही झाले काय.? आम्हाला त्याबद्दल कोणतेही सोयर सुतक नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे. मराठ्यांना जे सांगितले होते ते त्यांनी केले आहे, आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

“…नाहीतर लोक तुम्हाला चपलेने हाणतील”

“मराठे आता सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागले आहेत आणि ते जिंकणार आहेत. निवडून येणाऱ्यांनी आनंदात हुरळून जायचे नसते आणि पडणाऱ्यांनी जास्त खचायचे नसते. निवडून आलेले आणि पडणारे दोघांनीही मराठा समाजासाठी सक्रिय झाले पाहिजे. निवडून आलेले आणि पडलेले या दोघांचीही जबाबदारी आहे. लोकांमध्ये राहले नाही तर पुढच्या पाच वर्षांत या दोघांनाही लोक टिपऱ्याने हाणतील. मराठ्यांनी पडलेले आणि निवडून आलेल्या दोघांनाही मतदान केलेले आहे. त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नासाठी लगेच बाहेर पडले पाहिजे आणि बाहेर पडले नाहीतर लोक तुम्हाला चपलेने हाणतील”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

“मराठा समाजाशी दगाफटका करायचा नाही”

“जनतेने जनतेचे काम केले आहे. कोणाला निवडून आणायचे ते आणले आहे. कोणाला पाडायचे ते पडले आहे. त्यामुळे मराठा समाजाची दगा फाटका किंवा बेईमानी करायची नाही, नाहीतर लोक तुम्हाला सोडणार नाहीत”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.