मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शिर्डी बंदची हाक, साईदर्शन आणि साई प्रसादालयाला वगळले

| Updated on: Oct 29, 2023 | 8:31 PM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा वाढतच असून उद्या शिर्डी शहरासह राहता तालुका बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डीचे साईदर्शन आणि प्रसादालय सुरु राहणार आहे.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शिर्डी बंदची हाक, साईदर्शन आणि साई प्रसादालयाला वगळले
manoj jarange patil
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, जरांगे पाटीलांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून शिर्डीत गेल्या तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरु आहे. शिर्डी शहरातून काल मेणबत्ती मोर्चा देखील काढण्यात आला होता. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा सकल समाजाने शिर्डी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थानात साई दर्शन सुरु ठेवण्यात येणार असून साई प्रसादालय देखील सुरु रहाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज कार्यकर्त्यांच्या आवाहनामुळे जरांगे हे पाणी प्यायले. दरम्यान, शिर्डीत प्रांत कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. त्यातच मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी उद्या शिर्डी शहर बंदचे आवाहन केले आहे. या बंदमधून साईदर्शन आणि साई प्रसादालय यांना भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वगळले आहे. शिर्डी शहरासह राहाता तालुका बंदचे आवाहन मराठा आंदोलकांनी केले आहे. राहाता तालुक्यातील 72 गावासह विविध संघटनांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. शिर्डीतील साई निर्माण करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध म्हणून शैक्षणिक कागदपत्रे आणि EWS यासह विविध कागदपत्रांची होळी करीत घोषणाबाजी केली आहे. तसेच शिर्डीत काल काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चला राहता तालुक्यासह शिर्डीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

येवला तालुक्यात एसटीच्या जाहीरातींना काळे

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवला तालुक्याती सुरेगाव रस्ता येथेही ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी नाशिक- छत्रपती संभाजी महाराजनगर राज्यमार्गावरील सुरेगाव रस्ता येथून येजा करणाऱ्या एसटी बसेसच्या जाहिरातीवरील मंत्र्यांच्या फोटोला काळे फासत आंदोलन केले. ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा देखील यावेळी आंदोलकांनी दिल्या.

नाशिक येथेही साखळी उपोषण

मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्येही मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजातील नाना बच्छाव यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय समाज शांत बसणार नाही, अशी भूमिका नाना बच्छाव यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तरीही नेत्यांनी कार्यक्रम घेतले तर विपरीत काही घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.