औरंगाबाद । दुही हा मराठ्यांना लागलेला शाप आहे, असं वक्तव्य काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं, त्याचाच एक दाखला मराठा क्रांती मोर्चातील नेतृत्वातील मतभेदांमध्ये दिसून आलाय. छत्रपती संभाजीराजेंचं (Chatrapati Sambhajiraje) नेतृत्व आम्हाला नकोय, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कोणाचंच नेतृत्व नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, अशी स्पष्टोक्ती मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शुक्रवारी या मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी गुरुवारी राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीराजेंवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडणाऱ्या संघटनांमध्येच मोठी फूट पडल्याचे पुढे आले आहे.
औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनातर्फे गुरुवारी एक बैठक बोलावली होती. मुंबईत झालेल्या या बैठकीत औरंगाबादमधून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वतः भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आमि वेताळ यांना बैठकीमध्ये प्रवेशच देण्यात आला नाही. बैठक सुरु होण्याच्या आधीच छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात आला. या या पत्रकार परिषदेत रवींद्र काळे,चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, पंढरीनाथ गोडसे, शैलेश भिसे, सुरेश वाकडे, अरुण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदी मराठा नेत्यांची उपस्थिती होती.
Maratha Reservation | रात्रीच्या अंधारात हे बैठका घेतात, संभाजीराजेंचं नेतृत्व नको, औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची स्पष्टोक्ती pic.twitter.com/90gpZ3kI4v
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2022
छत्रपती संभाजीराजे सर्वव्यापक बैठका घेत नाहीत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला. ते म्हणाले, ‘ नेतृत्व सर्वसमावेशक असलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पहिल्यापासून सगळे एकत्र होते. कालच्या बैठकीत एकही माणूस नव्हता. आमचं कुणीही नेतृत्व नाही. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारात घेता. सर्व व्यापक बैठका का घेत नाहीत? सर्वांना का बोलवत नाहीत? मोजक्या चेहऱ्यांसमोर काय चर्चा चालवली आहे? छत्रपती संभाजीनगरातून तो सुरु झालंय.. मराठा नेत्यांचा वारंवार अपमान होत असेल, त्यावर तुम्ही राजकीय पोळ्या भाजत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल… छत्रपती संभाजीराजेंच्या आजूबाजूची जी मंडळी आहेत, त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हा डाव रचला जात आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे.