ओबीसींनी 40 वर्ष आमचं आरक्षण खाल्लं; मनोज जरांगे उघड बोलले

| Updated on: Nov 09, 2023 | 4:01 PM

जगात 50 वर्षापूर्वची आंदोलन कसे झाले? त्यांच्या काय चूका झाल्या? काय बरोबर होतं? हे लक्षात घेतलं. आंदोलनाला स्वराज्याचा विचार जोडला, यामुळे आंदोलन यशस्वी होतंय. शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेतलं. त्यांना यश मिळालं. आपणही जागरूक राहू. शांतेत आंदोलन करू आणि यश मिळवूच, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहनही केलं.

ओबीसींनी 40 वर्ष आमचं आरक्षण खाल्लं; मनोज जरांगे उघड बोलले
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 9 नोव्हेंबर 2023 : मराठे कुणबीच असल्याचे असंख्य पुरावे मिळाले आहेत. पुरावे मिळाले तरी छगन भुजबळांना काही सहन होत नाही. पूर्वीचे वंशावळ पुरावे बघून प्रमाणपत्र दिलं जात आहे. गेली 40 वर्ष सामान्य मराठ्यांवर अन्याय झाला आहे. ओबीसी नेत्यांनी 40 वर्ष आमचं आरक्षण खाल्लं हे सामान्य ओबीसींना पटलं आहे. त्यामुळेच ते आमच्या बाजूने उभे आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मनोज जरांगे पाटील येत्या 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 23 नोव्हेंबरपर्यंत हा दौरा असणार आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापासून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल. त्याचा शेवट शेगाव येथे होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सहा टप्प्यात हा दौरा असणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून मराठा समाजाचे प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

कुणालाही पैसे देऊ नका

आम्ही दौऱ्यात पैसे घेत नाही. राजकारणी, अधिकारी, डॉक्टर सगळ्यांना याबाबत माहिती आहे. कोणी मागितले तर देऊ नका. जर दिले असेल तर त्यांच्याकडून पैसे परत घ्या. जर कुणी चारआणे दिले असेलत परत घ्या ही सगळ्यांना सूचना आहे. कुणी लोकांकडून पैसे उकळल्याचं आम्हाला कळलं तर समाज त्याची गय करणार नाही. त्याला माफ करणार नाही. त्यामुळे आमच्या आंदोलनाला डाग लागणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

एकजूट दाखवायची आहे

सरकारला 24 डिसेंबरची तारीख दिली आहे. ही तारीख जवळ येत आहे. आपल्याला जागरूकपणे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे. समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका. हे शेवटचं आवाहन आहे. घरातील सर्वांनी एकत्र राहा. आपल्याला 24 तारखेला आपली एकजूट दाखवायची आहे, असंही ते म्हणाले.

पोपटाचा वाघ झाला

मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे, असं विधान प्रकाश शेंडगे यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. पोपट मेला याचा काय उत्तर देऊ? त्यांना सांगा पोपटाचा आता वाघ झाला. तो आता पाळायला लागला. आहे, असा टोला त्यांनी लगावला.

वाट पाहून म्हातारा

राज्य सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. तीन दिवसांपासून तेच सांगितलं जात आहे. आम्ही शिष्टमंडळाची वाट पाहत आहोत. शिष्टमंडळाची वाट बघून म्हातारा होत आहे. त्यांना गाडी मिळत नाही का ते कळतं नाही? मात्र त्यांनी आजचा शब्द दिला आहे. आज ते नक्की येतील. आम्ही वाट पाहतोय, असं ते म्हणाले.

ब्रह्मास्त्र काढायला लावू नका

धनंजय मुंडे आणि शिष्टमंडळ उपोषण सोडायला आले तेव्हा ते म्हणाले आपण लिहिल्याप्रमाणे सगळं होईल. नाही झालं तर मुंडे राजीनामा देणार म्हणाले होते. 15 दिवसात गुन्हे मागे घेऊ असंही ते म्हणाले होते. ते शब्द पाळतील. आम्हाला लेखी हमीची गरज नाही. आम्हाला फसवल्यास त्यांचा कसारा आमच्याजवळ आहे. मराठ्यांना ब्रह्मास्त्र काढायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला.