मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “जिथे जिथे मराठ्यांना त्रास दिला तिथे त्यांचा हिशेब होणार. 100 टक्के हिशोब होणार. मराठा असो की ओबीसी कुणालाही सुट्टी नाही. भाजपच्या मिशनच्या नादात त्यांचे सगळे अड्डे उद्धवस्त होणार. भाजप आमदाराचं मिशन फडणवीस यांना वाचवण्यासाठी सुरू आहे ते मिशन सत्तेत येण्यासाठी आहे तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नाही. यावेळी हिशोब होणार, वंचितांच्या गरिबांच्या बाजूने यावेळी यश येण्याची शक्यता आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“पक्ष आणि नेत्यांची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घ्या. ज्यांना हे लोक उमेदवारी देणार नाहीत तेही माझ्याकडे येणार. जे आमच्याकडे येतील त्यांना संधी द्यावी तरी कशी? आमच्याकडेच 150 तयार आहेत. रोज आजी-माजी आमदार भेटायला येतात. माजी जास्त येत आहेत. मराठे सगळ्यांना सोबत घेऊन एका मार्गाने चालणार. देवेंद्र फडणवीस यांनी सगळे चोरटे एकत्र केले. भुजबळ हा चोट्ट्यांचा नॅशनल अध्यक्ष आहे”, अशी खोचक टीका मनोज जरांगे यांनी केली.
“EWS मुळे मराठ्यांचं नुकसान झालं असं एक नेता बोलला. मग SEBC का लागू केलं? कायदा तुम्हीच बनवला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, जसं काही माझ्यामुळे EWS गेलं आहे. नुकसान करायला जबाबदार तुम्ही आहात. त्यामुळे EWS, SEBC, कुणबी हे तीनही पर्याय खुले ठेवा. जात प्रमाणपत्र राबवण्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्या. तुम्ही मिशन सुरू केलं की आम्हीही मिशन सुरू करू. तुमचं मराठवड्यात मिशन सुरू झालं की विदर्भ, कोकणात सगळीकडे आम्ही आभियान सुरू करु”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“29 ऑगस्टला निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर त्यासाठी उमेदवारांना लढवण्याची तयारी ठेवा. आम्ही भेटायला येणाऱ्याना सांगतो, आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला राजकारणात यायचं नाही. भाजपच्या लोकांनी त्यांच्या नेत्यांना सांगावं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांनी यावेळी बांगलादेशमधील हिंसाचारावरही प्रतिक्रिया दिली. “आरक्षणाची किंमत गरिबांना माहीत आहे. त्यांना कळणार नाही. गरिबांच्या वेदना जाणून घ्याव्या लागतात. एसीत बसणाऱ्यांना त्याची किमंत कळणार नाही. बांगलादेश सारखं इकडे होणार नाही. महाराष्ट्र नेत्यांचा नाही. आमचा आहे. त्यांना महाराष्ट्र बिघडवण्याची इच्छा आहे. फडणवीस यांचं दंगली होण्याचं स्वप्न भंगणार”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.