पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचा लढा सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरेच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीवर ते ठाम असून त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान मराठा आंदोलनाची सरकारला धास्ती आहे. सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंती असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जालना येथे झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाजात राज्य सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाबद्दल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून काढलेल्या मसुद्यावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांचे समाधान झाले नसून विविध मागण्यांसाठी ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याचे पडसाद शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमात होऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शिनवेरीवरील मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.
कुठे होणार शिवजयंतीचा कार्यक्रम ?
दरवर्षी शासनाकडून १९ फेब्रुवारी रोजी श्री शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडतो. राज्यातील वातावरण सध्या मराठा आरक्षणामुळे ढवळून निघालं आहे. जालन्यात झालेल्या लाठीमारामुळे मराठ्यांमध्ये नाराजाीचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शिवनेरीवरील मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याकरिता भारतीय पुरातत्त्व विभागानेही तातडीने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे दोन दिवस जुन्नर येथे स्वत: सर्व व्यवस्था पाहण्यासाठी हजर आहेत. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, म्हणून ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.