मुंबई : मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा सध्या मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केटमध्ये थांबलेला आहे. मनोज जरांगे यांच्या सग्या सोयऱ्यांना आरक्षण (Maratha Aarakshan) देण्याच्या मागणीसंबंधी सरकारने तोडगा काढला का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला आंदोलन स्थळी पोहचलं आहे. या शिष्टमंडळात समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ नुकतेच आंदोलन स्थळी पोहचले असून मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. तुर्तास शिष्टमंडळाच्या सदस्यांपैकी माध्यमांशी बोलण्यासाठी कोणीच तयार नसल्याचंही दिसत आहे.
आज रात्रीपर्यंत विशेष अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर सरकाच्या दिवसभर मॅराथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर रात्री अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथील पीएमपीएल मार्केटला पोहचले आहे. माध्यमांशी तुर्तास बोलण्यास नकार दिला आहे. सचिव सुमंत भांगे, मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर आरगळ, अमोल शिंदे, मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. सग्या सोयऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणासंबंधी तसेच आरक्षणासंबंधी इतर मागण्या संबंधी सरकारची भूमीका काय आहे या बाबात चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान आज गुड न्युज मिळणार असं सुचक विधान शिष्टमंडळाने केलं होतं, मात्र त्यावर अधिक प्रतिक्रीया देण्यास त्यांनी नकार दिला होता.