नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटेच त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं , उत्साहाचं वातावरण आहे.
मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेत सर्वांना संबोधित केलं. सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे त्यांनू नमूद केले. ‘ एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दलही ते बोलले. ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही द्यावं ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेणार
सरकारने सगासोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आला आहे. राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडली आहेत, त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षण चे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्य पिंजून काढले. राज्यातील विविध भागात, गावा-खेड्यात सभा घेत त्यांनी आंदोलन तीव्र केले होते. अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. आज सकाळी वाशी येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार असून त्यानंतर विराट सभा घेण्यात येणार आहे. त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.