मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) लढा देण्याऱ्या मनोज जरांगे यांच्या परिवारासाठीही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या मनोज जरांगे यांच्या परिवाराने tv9 मराठीला विशेष प्रतिक्रीया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांचादेखील मोठा वाटा आहे. मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यांपासून स्वतःत्या घरी देखील गेले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही असा पण मनोज जरांगे यांनी घेतला होता. माझं जीवन हे मराठा समाजासाठी समर्पित आहे असं मनोज जरांगे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांमधून सांगितलं आहे. आता जरांगे यांचा परिवार त्यांची आतूरतेने वाट पाहात आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांच्या मुद्यांवर अडलेला होता मात्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशात मराठ्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्या परिवाला या क्षणाचा अत्यंत आनंद झालेला आहे. समाजासाठी लढणाऱ्या त्यांच्या वडीलांबद्दल बोलताना जरांगे यांची मुलं अतिशय भावूक झाली होती. गेल्या पाच महिन्यांपासून आपले पती घरी आले नसुन ते समाजासाठी लढत असल्याची प्रतिक्रीया जरांगे पाटील यांच्या पत्नी आणि मुलांनी दिली. आम्ही पप्पांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करू असंही त्यांचे मुलं म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला अखेर आज यश आलं आहे. या सगळ्यात त्यांच्या कुटूंबीयांचा त्याग हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. आता आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे आपल्या वडीलांनी घरी यावं अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे. या यशाचे श्रेय आपले वडील आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा आंदेलकांना जातं अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे यांच्या मुलीने दिली आहे.