गणेश सोळंकी, बुलढाणा : नाशिक येथील काळाराम मंदिर (Kalaram Remple) प्रकरणाचा मुद्दा उफाळून आल्यानंतर राज्यात आता आणखी एका मागणीने जोर पकडलाय. सगळ्या मंदिरातील ब्राह्मण पूजारी हटवावेत. त्यांच्याजागी बहुजन मुला-मुलींची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकाराचा मराठा सेवा संघाने तीव्र निषेध केला आहे. या प्रकारानंतर आता राज्यातील मंदिरे भटमुक्त करण्याची वेळ आली आहे, असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. सदर मागणीवरून मराठा सेवा संघाच्या शाखा राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका खेडेकर यांनी मांडली.
नाशिक येथील काळाराम मंदिर प्रकरणानंतर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुखांनी मागणी केली होती, त्याप्रमाणे आता सर्व मंदिरं भटमुक्त व्हावीत. मंदिरांचं राष्ट्रीयीकरण करावं. तेथील पैसा मुला-मुलींचं शिक्षण, महिलांची उन्नती यासाठी वापरावा, अशी आमची मागणी आहे. मराठा सेवा संघाची जिजाऊ ब्रिगेड लवकरच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे, अशी माहिती खेडेकर यांनी दिली.
कोल्हापुरच्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्याबाबतीत काळाराम मंदिरात जे वर्तन केलं, त्या पंडितांचा मी निषेध करतो, असं वक्तव्य पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं. ते म्हणाले, ‘ पंढरपूरप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मंदिरं भटमुक्त करावीत. मंडल आयोगानुसार, तेथे बहुजन मुलं-मुली नियुक्त करावीत. यामुळे वेदोक्स आणि पुराणोक्त वाद संपेल. एकिकडे आपण सर्व हिंदू एक आहोत, असे सांगतो. सावरकरांबाबत कितीही वाद असले तरीही त्यांनी हा भेद कधी केला नाही.. नाशिकमध्ये घडलेला प्रकार निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी हे लाजिरवाणं आहे….
कोल्हापुरच्या संयोगिताराजे छत्रपती या संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र पठनास मनाई केल्याच आरोप संयोगिताराजे यांनी केला. ही घटना घडल्यानंतर १० पेक्षा जास्त दिवसांनी संयोगिता यांनी सदर प्रकरणावरून सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर नाशिक येथील महंतांविरोधात यावरून राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. याच प्रकरणात आता मराठा सेवा संघाने नाशिक येथील महंतांचा निषेध केलाय.