बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अखेर 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर बीड कोर्टासमोर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे समर्थक आमनेसामने आले. यामुळे बीडमध्ये दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिला आहे.
“बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. धनंजय मुंडे पांगरीत त्यासाठीच आले. पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला आहे. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री साहेब याला थांबावा. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये, अन्यथा आम्हीही सहन करणार नाही”, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“न्यायदेवता न्याय करणार आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची हाय लागली आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींवर मोक्का दाखल करा, असे मी आधीच म्हटले होते. ही आमची पहिल्यापासूनची मागणी होती. तसेच प्रचंड मोठा दहशत पसरवणारी, जातीयवाद, जातीय तेढ निर्माण करणारी धनंजय मुंडेंची टोळी आहे. या टोळीचा नायनाट झाला पाहिजे. या टोळीचा नायनाट करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“आता याचा तपास पोलीस, सीआयडी, एसआयटी असा सर्वांचा एकत्रित होणार आहे. त्यांच्या हाती मोठे पुरावेही लागले आहेत. खून झाल्यावर एकमेकांना फोन केले आहेत. त्यांनी व्हिडीओ कॉलही केले. संतोष भय्या ओरडत होते, वेदना सहन करत होते. पण यांना काहीही दया-माया आली नाही. या आरोपींनी सरकारमधील मंत्र्याला वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. यांना साथ देणाऱ्यांनीही फोन केलेले आहेत. हे सर्व चार्जशीटमध्ये यायला हवं. यातील एकही आरोपी सुटता कामा नये. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“या जबाबदारीने त्यांनी राज्याला लागलेला डाग, परळीला लागलेला डाग, धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी आता त्यांच्या जातीलाही मान खाली घालण्याची वेळ आली आहे. यामुळे धनंजय मुंडेंची टोळी संपली पाहिजे. धनंजय मुंडेंची टोळी आहे. काल धनंजय मुंडे याच्यासाठीच परळीत आले होते. देशमुख कुटुंबाला भेटावं असं त्याला वाटलं नाही. माणुसकी त्यांच्यात जिवंत नाही. हा माणूस फक्त पैसे…जात वैगरे काही नको, फक्त पैसे आणि पद पाहिजे. यासाठीच जन्म घेतला. क्रूर आहे हे सर्व”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“पडद्याच्या पाठीमागे राहून धनंजय मुंडेसाठीच त्याने माया जमवली. ही जातीवादी टोळी पसरवणारी टोळी आहे. यांची टोळी माजलेली आहे. यांचा माज उतरवायला टाईम लागणार नाही. न्यायालय पुढे सुरू आहे. कुठे गेली तुमची लावलेली संचारबंदी? ते जवळ करायच्या लायकीचे आहेत का? त्यांना सामाजिक सलोखा ठेवायचा नाही? आरोपींना हे साथ कसे देऊ शकतात.? त्यांना सह आरोपी करा. ज्यांनी कट रचला तो खरा गुन्हेगार आहे. यांना सगळ्यांना शोधा. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहे. यांच्या सगळ्यांच्या नार्को टेस्ट करा”, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.