संगमनेर/अहमदनगरः सध्या शेती क्षेत्राबाबत समस्यांचा डोंगर उभा राहिलेला असतानाच काही शेतकऱ्यांनी त्यातून पर्याय शोधण्याचा मार्ग काढला आहे. राज्यात सध्या कांदा प्रश्नामुळे शेतकरी हैराण झाले असतानाच काही शेतकरी मात्र शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगामुळे त्यातून नवीन अर्थकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक नवा प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही फुलाप्रमाणं थोडंफार हसू उमललेलं आहे.
संगमनेर तालुक्याच्या कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर सहाणे आणि निवृत्ती सहाणे या शेतकरी बंधूंनी आपल्या तीन एकर शेतीत ‘अप्सरा यल्लो’ या झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे.
आता ही शेती फुलली असून, जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे. सध्या फुलांना प्रतिकिलो 75 ते 80 रुपयांचा भाव मिळत असून सहाणे बंधूंच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.
एकीकडे शेतीच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. तर दुसरीकडे सहाणे बंधूच्या या शेतीतील प्रयोगामुळे मात्र शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात त्यांना हातभार लागत आहे.
ज्ञानेश्वर आणि निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत आले आहेत. त्यांना अवघी चार एकर शेती असून त्यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा यल्लो झेंडूची लागवड केली आहे. तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पादन निघत असून सरासरी 80 रुपये प्रतिकिलो प्रमाणे काही महिन्यातच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सहाणे बंधूंच्या या मेहनतीला कुटुंबीयांचीदेखील भक्कम साथ मिळाली आहे. नोकरदारवर्ग ज्याप्रमाणे आठ तास काम करतो, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी कमीत कमी आठ तास शेतीत काबाडकष्ट केले तर शेतकरी नक्कीच यशस्वी होऊ शकतो अशा भावना सहाणे बंधूंच्या आहेत.
बाजारपेठ, वातावरण आणि शेतीत नवीन प्रयोग करण्याचे तंत्र आत्मसात केले तर इतरही शेतकरी सहाणे बंधुंप्रमाणे आर्थिक सुबत्ता साधू शकतात एव्हढे मात्र नक्की सध्या शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत असला तरी अशा नवनव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मात्र हातभार लागणार असल्याचे सहाणे बंधू यांच्याकडून सांगण्यात आले आहे.