प्रवीण चव्हाण, पालघर : सध्या लग्न सराईची धूम सुरु असून लग्न कार्य आलं म्हटल्यांवर अनोख्या लग्न पत्रिकेचा (palghar news) विचार सुरु होतो. लग्नाची पत्रिका आकर्षक असली पाहिजे किंवा वेगळी असली पाहिजे, अशी अनेक कुटुंबियांची अपेक्षा असते. त्यामुळे कुणी पारंपारीक पध्द्तीने, तर कुणी वेगळं पण जपत कल्पकतेने लग्न पत्रिका (Marriage card) छापून लग्नाचे निमंत्रण देतात. आज वर तुम्ही अनेक आकर्षक आणि वेगवेगळ्या लग्न पत्रिका पाहिल्या असतील. परंतु चक्क हात रुमालावर लग्न पत्रिका (Marriage card on handkerchief) पाहिली आहे का ? नाही ना चला तर मग कशी आहे, ही पत्रिका आम्ही आपण पाहू या.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उप निरीक्षक असलेल्या दामसे कुटूंबियांनी आपल्या मुलाची लग्न पत्रिका वेगळपण जपत हात रुमालावर छापली आहे. आपण नेहमीच पॅन्टच्या खिशात हात रुमाल ठेवतोच, बरोबर ना त्याच पांढऱ्या शुभ्र हात रुमालावर ही पत्रिका छापली आहे. आकर्षक तर ही पत्रिका आहेच, शिवाय धुतल्या नंतर निमंत्रण दिलेल्या व्यक्तीच्या उपयोगात ही येणार आहे. एका पत्रिकेसाठी दामसे कुटुंबियांना 15 रुपये खर्च आला असून देव देवतांचा चित्राची विटंबना होऊ नये यासाठी पत्रिकेवर आदिवासी वारली चित्र छापण्यात आले आहे.
आकर्षक आणि विविध रंगाच्या, सुगंध दरवळणाऱ्या अश्या ही महागड्या लग्न पत्रिका बाजारात उपलब्ध आहेत. परंतु लग्नानंतर ह्या पत्रिका अडगळीत पडलेल्या असतात. तर काही पत्रिका कचऱ्याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळं पत्रिकेवर असलेल्या देवांची विटंबना तर होतेच. शिवाय झाडापासून बनलेल्या कागदाचा ऱ्हास होतो. पर्यावरण प्रेमी असलेल्या रवींद्र दामसे आणि सौ.उज्वला दामसे दाम्पत्यानी वेगळं पण जपत हात रुमालावर लग्न पत्रिका छापत पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
कोल्हापूरच्या एका तरुणाने कोल्हापूरी भाषेत लग्न पत्रिका छापली होती. त्यावेळी त्याची सुध्दा राज्यभर चर्चा झाली होती. त्या तरुणाचं नावं R J Sumit असं होतं. त्या तरुणाच्या पत्रिकेची राज्यभर चर्चा झाली होती.