बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केसगळतीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून त्यावर अद्यापही काही उपाय सापडलेला नाही. दिवसेंदिवस केसगळतीची प्रकरणं वाढतंच चालली असून त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे.त्यातच आता एक महिलेच्या केसगळतीचा व्हिडीओ समोर आला आहे. गावातील एका महिलेचे केस अगदी सहजपणे हातात येत असल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास करण्यासाठी, केसगळतीचे नेमके कारण शोधण्याचा ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे पथक बुलढाण्यात दाखल झाले असून शास्त्रज्ञांनी तपासणीस सुरुवात केली आहे.
टक्कल पडत असलेल्या महिलेचा धक्कादायक व्हिडिओ हाती
शेगांव तालुक्यातील केस गळती प्रकरण पंधरा दिवसांपूर्वी समोर आल्यावर आजपर्यंत शेगांव सह नांदुरा तालुक्यात 156 पेक्षा जास्त रुग्णांना टक्कल पडत असल्याचे आढळले आहे. मात्र , हे टक्कल कशामुळे पडत आहे, एवढी केसगळती कशामुळे होत आहे, याचा आरोग्य विभागाला अद्यापतरी शोध लागलेला नाही. याच दरम्यान एका महिलेच्या केसगळतीचा व्हिडीओ समोर आला असून,तिचे केस अगदी सहज हातात येत आहेत. बोंडगाव येथे पाहुणी म्हणून आलेल्या एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस सहजपणे हातात येत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेच्या डोक्यावरील केस हे सहजपणे हातात येत असून पूर्णपणे टक्कल पडले आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती असून भयावह स्थिती आहे.
ICMR चे पथक गावात दाखल, तपासणी सुरू
दरम्यान या केस गळतीच्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी, त्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे पथक गावात दाखल झालं असून शास्त्रज्ञांनी तपासणीस सुरुवात केली आहे. शेगाव तालुक्यातील 13 च्या जवळपास गावांमध्ये केस गळती आणि नागरिकांमध्ये टक्कल पडण्याच्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा हादरलेली आहे. आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुंबई चेन्नई दिल्ली येथील तज्ञांद्वारे या गावांतील रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा केली होती, त्यानुसार ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीची सर्व पथके, डॉक्टर्स या गावांमध्ये पोचले आहेत. या पथकात 8 लोकांचा समावेश असून त्यामध्ये दिल्ली, चेन्नई, भोपाळसह पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर असून ते गावातील रुग्णांची तपासणी करून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तज्ञ डॉक्टरांनी सुद्धा तालुक्यातील बोंडगाव येथे पोहोचून रुग्णांच्या तपासणी सुरुवात केलेली असून विविध सँपल्स गोळा करण्याचे काम सुरू झालेले आहे. विविध प्रकारांचे नमुन घेऊन ते लॅब मध्ये तपासले जातील आणि मगच या आजाराचे कारण समोर येईल. सँपल्सच्या तपासणीनंतर निष्कर्ष काढला जाईल असे या डॉक्टरांनी सांगितले. कितीही दिवस लागले तरी आजाराचा शोध लावूनच या ठिकाणावरून जाऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.