औरंगाबाद : राज्यात शनिवारी संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी आकाशातून काहीतरी पडताना दिसलं. हा उल्कापात (Meteor Shower) होता की अजून काही? यावर अद्याप अभ्यास आणि चर्चा सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती (Fear) आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना संध्याकाळच्या सुमारास आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. ती वस्तू जळताना दिसत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, पडणारी वस्तू नेमकी काय आहे? याची नेमकी माहिती अद्याप कळू शकलेली नाही. असं असलं तरी आकाशातून पडणारी वस्तू किंवा वस्तूचे अवशेष हे इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचे तुकडे (Rocket booster pieces) असल्याचं औरंगाबादेतील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलंय.
#WATCH | Maharashtra: In what appears to be a meteor shower was witnessed over the skies of Nagpur & several other parts of the state. pic.twitter.com/kPUfL9P18R
— ANI (@ANI) April 2, 2022
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किलोमीटर उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद आहे. त्यामुळे आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली वस्तू ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावी. आपल्या भागात साधारण 30 ते 35 किमी उंचीवरून बुस्टरचे वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग आणि प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणताही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चित असल्याचं औंधकर म्हणाले.
राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्री 8 च्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ/धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर अनेकांनी विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती? याची ठोस माहिती द्याप कळू शकलेली नाही.
इतर बातम्या :