दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री संभाजीनगरात (Sambhajinagar) झालेल्या राड्यावरून (Rada) शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दोन गटात निर्माण झालेला तणाव तूर्तास निवळला असला तरीही राजकीय नेत्यांची परस्परांवर चिखलफेक सुरु आहे. यातच खा. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शहरातील पोलिस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. किराडपुरा भागात सदर तणाव सुरु झाला तेव्हा मला वारंवार फोन येत होते, मी त्या ठिकाणी दाखल झालो तेव्हा परिस्थिती फारच भीषण होती. पण एवढ्या मोठ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त १५ ते १७ पोलीस कर्मचारी होते. पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावले तेव्हा ते येतोय येतोय म्हणत होते. मात्र तब्बल दोन तास तिथे कुणीही आले नाहीत, असा गंभीर आरोप खा. जलील यांनी केलाय.
सदर हल्ल्यात खा. इम्तियाज जलील यांचा हात होता, असा आरोप केला जातोय. हे आरोप जलील यांनी फेटाळून लावले. उलट या घटनेतील बेधुंद तरुणांनी माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळा मी पोलिसांची लाठी-काठी घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्यावर तरुण दगड फेकत होते. त्यामुळे पोलिसांनी मला आत बसवलं. मी तीन तास तिथे होतो. तिथे अनेक राम मंदिरातले कर्मचारी होते. कोणत्याही परिस्थितीत मंदिराला कुणी हात लावणार नाही, ही जबाबदारी माझी आहे, असं आश्वासन दिलं.
संभाजीनगरात घडलेल्या राड्याप्रकरणी एक निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी माझी विनंती आहे. शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे.
खा. जलील यांनी काल रात्री नेमका काय प्रकार घडला, याची आपबिती सांगितली. ते म्हणाले, ‘
राम मंदिरातलं सीसीटीव्ही फुटेज पाहा आणि सगळी परिस्थिती समोर येईल. नशेबाज तरुणांनी हा गोंधळ घातला. एवढ्या मोठ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त १५ ते १७ पोलीस उभे होते. मी वरिष्ठांना कॉल करत होते, तेव्हा सगळेच नुसते येतोय येतोय म्हणाले. दोन तासात सगळे तिथे आले, मात्र तोपर्यंत सगळं घडलं होतं. या घटनेत काही जीवितहानी झाली नाही, हे बरं झालं. गाड्यांची जाळपोळ झाली, पण राम मंदिराला इजा झाली नाही.
सदर घटनेसाठी खा. इम्तियाज जलील हे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना, भाजपकडून करण्यात येतोय. मात्र अशा प्रकारचे आरोप नेहमीच माझ्यावर होतात. मी एक सॉफ्ट टार्गेट असल्यासारखे नेते बोलत असतात. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे.