संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संध्याकाळच्या सभेत माहिम (Mahim) येथील अनधिकृत मजार हटवण्याची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही मजार हटवली. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ज्या अत्यंत नाट्यमय घडामोडी घडतायत, त्याच मालिकेतली ही घटना आहे. हे सगळं आधीपासूनच ठरलेलं होतं. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामागे भाजपचाच हात होता, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. राज ठाकरे, भाजप आणि सध्याची शिवसेना हे तिघेही एकत्र आले असून उद्धव ठाकरे यांना फिनिश करण्याचा यांचा डाव आहे, असा दावा खा. जलील यांनी केलाय. माहिम येथील ती मजार अनधिकृत असेल तर या कारवाईला माझं समर्थनच आहे, मात्र त्याचं जे राजकीय भांडवल केलं जातंय, ते लोकांना समजतंय, त्यांना निर्बुद्ध समजू नका, असा इशारा खा. जलील यांनी दिलाय. नवी दिल्लीत त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
माहिम येथील मजारीवर कारवाईवरून खा. जलील म्हणाले, ‘ तो दर्गा अनधिकृत असेल तर या कारवाईचं स्वागत करतो. धार्मिक रंग देऊन काही अनधिकृत उभं राहत असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण आश्चर्य असं वाटतं की माहिममध्ये एक दर्गा उभा राहतो. त्याचा व्हिडिओ सभेत दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपने त्यांना हा क्लू दिला. तू जाऊन ही घोषणा कर. इशारा दे. 12 तासांच्या आत ही कारवाई होते. यावरून राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे स्पष्ट आहे.
राज्यातील सत्तेतील शिवसेना, भाजप आणि राज ठाकरे यांची मनसे या तिघांनीही ठरवलंय. उद्धव ठाकरेंना फिनिश करायचंय. त्यासाठी राज ठाकरेंना मोठं केलं जातंय. सरकारमध्ये बसून हिंदू-मुस्लिम भेद करता येत नाहीत. मर्यादा असतात. पण राज ठाकरेंसारखे पपेट्स हे करू शकतात.1 वर्षापूर्वी ते औरंगाबादला आले होते. भोंगे काढा म्हणाले. एक वर्ष गप्प होते. आता मतदान आल्यावर पुन्हा माहौल करायचा, हे यांचं षडयंत्र आहे, असा आरोप खा. जलील यांनी केलाय. पण आता लोक हुशार झालेत. आज दर्ग्यावर कारवाई झाली तर एवढे दिवस पोलीस काय करत होते? असा प्रश्न ते विचारत आहेत.