एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर टीका, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

| Updated on: Jan 28, 2024 | 8:27 PM

राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत पलटवार केलाय.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर टीका, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता
MP Imtiaz Jalil
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

परभणी | 28 जानेवारी 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्ण येथे संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र, या सोहळ्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत पलटवार केलाय.

परभणी येथील संविधान गौरव सोहळ्यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेतील एक उदाहरण दिले. आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे 360 खासदार यांच्यासमोर सांगितले की देशामध्ये केवळ एकच महापुरुष झाले आणि ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते असे सांगितले.

भाजपच्या नेत्यांनी ते मान्य केले नाही. कारण, त्यांच्या मते देशात एकच महापुरुष आहेत ते म्हणजे सावरकर. पण, ‘ऐसे भगोडे को ना हमने कभी माने है न कभी मानेगे.’ असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकर यांच्यावर टीका केली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या या विधानाचे राज्यात राजकीय पडसाद उमटले आहेत. शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ही औरंगजेबाची अवलाद आहे, निजामाची अवलाद आहे. त्यांना सावरकरांबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. मात्र, दुर्दैव तेव्हा आपलेच लोक बोलतात. या निजामाच्या औलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. सावरकर राज्याचेच नव्हे देशाचे दैवत आहेत अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली.

भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेला उत्तर दिलंय. त्यांनी म्हणायचं की नाही म्हणायचं हा त्यांचा व्यक्ती भाव आहे. हा देश सावरकरांना मानतो आणि सावरकरांना मानत असताना त्यांनी मानले नाही म्हणून काही स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य योद्धा सावरकर यांचे महत्त्व कमी होणार आहे का? असा सवाल केला. ते राजकारणासाठी तसं बोलतात. मताच्या दृष्टिकरणासाठी ते बोलतात. हा देश मात्र स्वातंत्र्य सावरकरांचे ऋण एकदाही विसरू शकत नाही असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, एमआयचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपचे अंतर्गत संगनमत आहे. त्यामुळे भाजपने त्यांना बोलायला सांगायचे आणि त्यांनी बोलायचं असा प्रकार पहिल्यापासूनच सुरू असल्याचा आरोप केला.