दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीही बिघाडी होईल असा दावा केला जात असतांना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्षाने सहभागी होण्यासाठी जाहीर केले आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत औरंगाबादमध्ये जाहीर केले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफरच देऊन टाकली आहे. एमआयएम पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायला तयार आहे. भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार आहोत असेही इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेनेच्या युतीनंतर एमआयएमची महाविकास आघाडीला ही ऑफर दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी हे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीची भूमिका महत्वाची असणार आहे.
राज्यात 2019 नंतर तीनदा अनोख्या आघाडी झाल्याचे बघायला मिळाले आहे. सुरुवातील भाजप आणि अजित पवार, त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आता विद्यमान सरकार असलेले शिंदे गट आणि भाजप असा प्रवास आहे.
त्यातच आता मध्यांतरी संभाजीब्रिगेड सोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे.
विशेष म्हणजे शिवसेना ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाहीये, त्यातच एमआयएमने वंचितच्या भूमिकेनंतर महत्वाची भूमिका घेतली आहे.
एमआयएमने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची इच्छा औरंगाबादमध्ये बोलून दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती 2019 ला होती. त्यातून वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत गेली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमनेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जलील यांनी दिलेली खुली ऑफर आता चर्चेचा विषय ठरणार आहे.