लाडकी बहीण योजनेचे पैसे लंपास करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती

| Updated on: Sep 30, 2024 | 4:30 PM

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे महिलेला मिळणारे पैसे लाटण्यात आले आहेत. नांदेडच्या सीएससी केंद्रचालकाने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे लंपास करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती
अदिती तटकरे
Image Credit source: Facebook
Follow us on

Aditi Tatkare On CM Ladki Bahin Yojana Scam : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या बहुचर्चित योजनेतंर्गत महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. एकीकडे हजारो महिला या योजनेचा लाभ घेत असताना दुसरीकडे याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे महिलेला मिळणारे पैसे लाटण्यात आले आहेत. नांदेडच्या सीएससी केंद्रचालकाने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने एक मोठा घोटाळा केला आहे. या सीएससी केंद्राचे नाव सचिन मल्टीसर्व्हिसेस असे आहे. सचिन थोरात हा तरुण हे केंद्र चालवतो. त्याने रोजगार हमी योजनेसाठी ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा केले. मात्र रोजगार हमी योजनेसाठी अर्ज भरण्याऐवजी त्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड देखील केली. महिलांच्या आधार कार्डवर त्याने पुरुषांचे नाव लिहिले. तसेच अर्ज करताना पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्यानंतर सचिन थोरात याने माझे रोजगार हमी योजनेचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, असे सांगत पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. यानंतर सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते. त्यानेही जमा झालेले पैसे सचिन थोरात याला नेऊन दिले. पण शंका आल्याने अलीम याने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला.

अदिती तटकरेंकडून अकाऊंट सील करण्याचे आदेश

याप्रकरणी आता अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमधील संपूर्ण प्रकरण साधारणपणे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. एका व्यक्तीने 37 अर्ज वेगवेगळ्या योजनांसाठी वापरले. आधारकार्ड वापरून लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरला. आता याबद्दल प्रशासन आणि तहसीलदार चौकशीसाठी गेले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबतही माझे बोलणे झाले आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

याप्रकरणी संबंधित बँकांना तात्काळ अकाऊंट सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुसरा कुठल्याही शासकीय योजनेचा व्यवहार होणार नाही, याची काळजी घेत आहोत. कुठलीही प्रक्रिया करताना १५ ते २० दिवस तपासणीसाठी देत आहोत. यानुसार येत्या १ ते ३१ जुलैच्या अर्जांना ऑगस्टमध्ये लाभ वितरित केला जाणार आहे. काही ठिकाणी याचा दुरुपयोग केला जात आहे. याबद्दलही शासन कारवाई करत आहे.

तसेच याप्रकरणी नांदेड घटनेतील अकाऊंट सील करत आहोत. प्रातिनिधिक स्वरुपात नागरिक सहभागी नसतील तर चौकशी अंती अकाऊंट पुन्हा सुरु करु. पण चौकशी होईपर्यंत हे अकाऊंट सील ठेवणे गरजेचे आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.