गेले दहा दिवस जालनातीलच वडीगोदीतील ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणामुळे आता राज्यातील ओबीसी देखील एकवटले आहेत. या उपोषण स्थळावर नुकतेच बीडमधून मराठा आंदोलनामुळे पराभव झालेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भेट दिली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील भेट दिली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उपोषणकर्त्यांना भेट देऊन थेट मुख्यमंत्र्यांनाच व्यासपीठावरुन फोन लावला. त्यानंतर आज वडीगोदीतील उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्ठमंडळ दाखल झाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात ओबीसी आरक्षणाला मराठा आंदोलनामुळे धक्का लागला असल्याचा आरोप केला.
आरक्षण हा काही गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. समाजातील सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या घटकाला मानसन्मान मिळावा, त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावावा यासाठी दुबळ्यांना प्रगती करण्यासाठी आरक्षण संविधानाने दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केलेल्या भाषणात म्हटले. महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं. ते बाबासाहेबांनी संविधानात आणलं आणि आम्हाला न्याय दिला. आमची सर्व लेकरंबाळं काही गाड्यातून फिरत नाहीत. ती ही अन्नाला मोताद आहे. त्यांची काय परिस्थिती आहे ?. त्यासाठी हे आरक्षण आहे. त्यात इतर वाटेकरी झाले तर आमचे काय होणार ? असाही सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्वत:च्या सरकारला घरचा आहेर देत केला आहे.
पंकजा ताई उभ्या राहिल्या. त्यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. तहीरी या लोकांनी त्यांना विरोध केला. सर्वांनी मिळून पाडलं. महादेव जानकर यांना पाडलं. आम्ही लोकसभेत जायचं नाही. आम्ही विधानसभेत जायचं नाही. आम्ही अधिकार क्षेत्रात जाऊ देणार नाही. असंच राहिलं तर लोकसभा आणि विधानसभेतही आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. म्हणूनच म्हणतो लढाई संपली नाही, लढाई सुरू आहे असे भुजबळ यांनी यावेळी म्हटले. कुणी म्हणेल आज आम्ही एवढे आहोत. लोकसभेत आम्ही जास्त आहोत. विधानसभेतही जास्त आहोत. आम्ही मागणी केली. देशात आणि महाराष्ट्रात मागणी केली की जातीय जातगणना व्हावी. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जातीगणनेला पाठिंबा आहे. नितीशकुमार यांनी केली. चंद्राबाबूंचं तेच म्हणणं आहे. विरोधी पक्षांचंही तेच म्हणणं आहे. सर्वांनी मागणी केली आहे की जातनिहाय लोकसंख्येची गणना व्हायलाच हवी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.