मुंबई : पुणे शहरात आपले वर्चस्व रहावे यासाठी कोयते, कुऱ्हाड घेऊन कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. या गॅंगच्या दहशतीखाली अनेक निष्पाप नागरिक वावरत होते. अनेक जण या गँगच्या हल्ल्यात जखमी झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत त्याबद्दल प्रश्न उपस्थित करून नागरिकांना या दहशतीच्या वातावर्णवातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी कोयता गॅंग विरोधात मोहीम उघडली. या गॅंगला आवर घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यान पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रोज पायी गस्त घालावी असे आदेश दिले. असे असतानाही शिंदे सरकारमधील एका मंत्र्याने या गँगच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विधानसभेत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा बाल सुधार गृहातून आठ विधी संघर्ष बालके पळून गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांवर खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी असे विविध गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच ही मुले कुप्रसिद्ध कोयता गँगची सदस्य आहेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली. राज्यात विशेषतः पुणे शहरात बाळ गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हा प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सरकार काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमदार सुनील टिंगरे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लेखी उत्तरात म्हटले की, बालगुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करु नये यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर त्यांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशन केले जाते. गुन्हा करण्यामागचे कारण समजून घेऊन त्यांना गुन्हा करण्यापासून परावृत्त केले जाते.
त्या बालकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाते. १८ वर्षांच्या आतील जे मुले-मुली त्यांच्या आई-वडिलांचे ऐकत नाहीत, वाईट व्यसने आणि सवयींना बळी पडले आहेत, अशा मुलांना समुपदेशनासाठी भरोसा सेल कार्यालयात नेण्यात येते. त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून आणि व्यसनाधिनतेमुळे होणारे नुकसान याचे मार्गदर्शन केले जाते.
येरवडा येथील बाल सुधार गृहातून पळून गेलेल्या ८ पैकी ७ मुलांना पुन्हा संस्थेत दाखल केले आहे. तर एका मुलाचा तपास सुरु आहे. पण, ही पळून गेलेली मुले कोयता गॅंगचे सदस्य नाहीत. मुळात पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कोयता गॅंग म्हणून कोणतीही गॅंग अस्तित्वात नाही असे ते लेखी उत्तरात म्हणाले आहेत.