ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. ठाण्यात पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एमआयडीसी तसेच जलसंपदा खात्याचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील हे चांगलेच संतापले. त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली, तर आठवड्याभरात गुलाबराव काय आहेत, हे समजेल असा सज्जड दम ही भरला. (Gulabrao Patil Angry on Government Employee)
ठाण्यातील नियोजन भवन येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील स्वत: उपस्थित होते. यावेळी पाणी समस्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे आणि 259 पाड्याना पाणीपुरवठा करण्यासाठी 276 कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना गती देऊन प्राधान्याने त्या योजना मार्गी लावण्याचे निर्देश गुलाबराव पाटील यांनी दिले.
जल जीवन मिशन अंतर्गत येणारी ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा दरमहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. जलजीवन मिशनव्दारे प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. तसेच अपूर्ण असलेल्या योजनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
येत्या 21 मार्चपर्यंत सर्व योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे. सर्व तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजनांना सहकार्य करण्याचे तसेच त्या वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्यास त्यासाठी सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी, प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधींना सोडणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
ठाणे महानगरपालिकासाठी स्वतंत्र धरणाचा विषय हा माझ्या माहितीचा नाही. तर राजकीय घडामोडी आणि काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री पदावर बोलण्यास टाळले. मलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद दिले आहे तर मी कोणाचे पद ठरवू असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. (Gulabrao Patil Angry on Government Employee)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पालघरचा झेंडा
अंबरनाथमध्ये मेडिकल हबची उभारणी होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मंजुरी